नाशिकमध्ये रबीच्या आशा धूसर; कडधान्याचे भाव वाढले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:16 PM2018-11-15T12:16:04+5:302018-11-15T12:16:54+5:30

बाजारगप्पा :नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून, भाव मात्र स्थिर आहेत.

Rabi hope dashed in Nashik; The price of the pulse increased | नाशिकमध्ये रबीच्या आशा धूसर; कडधान्याचे भाव वाढले 

नाशिकमध्ये रबीच्या आशा धूसर; कडधान्याचे भाव वाढले 

Next

- संजय दुनबळे (नाशिक)

दिवाळीनंतर मागील सोमवारपासून कामकाज सुरू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून, भाव मात्र स्थिर आहेत. रबी हंगामाचा कोणताही अंदाज नसल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कडधान्यांचे भाव किलोमागे ८ ते ९ रुपयांनी वाढले आहेत. शेतमालाची आवक पाहून भाव ठरत असले तरी मक्याचे भाव अद्याप स्थिर असल्याचे दिसून आले. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीनंतर गेल्या मंगळवारपासून भुसार मालाचे लिलाव सुरू झाले. येथे मक्याची सुमारे २०० टनाची आवक असून, कोरड्या मक्याला १४०० रुपये प्रतिक्विं टलचा दर मिळत आहे. बाजरीच्या आवकेत काहीशी घट झाली असून, बाजरीला २००० ते २२०० रुपये प्रतिक्विं टल दर मिळत आहे. लासलगावी हरभरा, तूर, उडीद या कडधान्यांची आवक कमी झाली असून, सर्वच कडधान्यांचे भाव वाढले आहेत. हरभऱ्याला साधारणत: ४६०० ते ४७००, तुरीला ३७०० ते ३८०० रुपये, तर उडिदाला ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विं टल दर मिळत असून, या कडधान्यांच्या दरात किलोमागे ८ ते ९ रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती भुसार मालाचे व्यापारी सचिन ब्रह्मेचा यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच भागात पाऊस कमी झाल्याने विहिरींना पाणी नाही. त्याचबरोबर धरणांमधून सिंचनासाठी आवर्तन सुटेल की नाही याचाही अंदाज नसल्याने रबीचे पीक समोर दिसत नसल्याने कडधान्यांच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. मालेगाव बाजार समितीत कडधान्याबरोबरच गव्हाचेही दर वाढले असल्याची माहिती भुसार मालाचे व्यापारी भिका कोतकर यांनी दिली. येथे गव्हाला किमान २७०० रुपये प्रतिक्विं टलचा भाव मिळत आहे. बाजरीची आवक कमी झाली असून, बाजरीला २००० ते २२०० रुपयांपर्यंत प्रतिक्विं टल दर मिळत आहे. या बाजार समितीतही कडधान्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे कोतकर म्हणाले. 

आगामी काळात आवक अधिकच मंदावण्याची शक्यता असल्याने भुसार मालाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज कोतकर यांनी व्यक्त केला. 
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची बऱ्यापैकी आवक असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती कमीच असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बुधवारी येथे सुमारे १०० वाहनांतून मक्याची आवक झाली. १४११ रुपये प्रतिक्विं टलचा दर मक्याला जाहीर झाला. गहू, बाजरी, हरभरा, तूर, भुईमूग या शेतमालाची आवक किरकोळ स्वरूपात असून, त्यांचे भाव टिकून आहेत. येथे गहू २५०३ रुपये, तर भुईमूग ६३५१ रुपये प्रतिक्विं टल दराने विकला गेला. हंगामी मार्केट असलेल्या चांदवड बाजार समितीत केवळ मक्याची आवक होत आहे. येथे बुधवारी केवळ १६ वाहनांमधून मका विक्रीसाठी आला होता. भाव साधारणत: १३८१ रुपये प्रतिक्विं टलपर्यंत होते. 

Web Title: Rabi hope dashed in Nashik; The price of the pulse increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.