पावसाअभावी रब्बी हंगाम धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 04:00 PM2018-10-18T16:00:50+5:302018-10-18T16:01:01+5:30
निफाड : करपलेल्या पिकांची तहसीलदारांकडून पाहणी
रामनगर : निफाड तालुक्याच्या दक्षिण सीमेवर असलेल्या तळवाडे ,महाजनपुर,रामनगर, पिंपळगाव निपानी ,भेंडाळी,औरंगपूर,बागलवाडी या परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीपाची पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांनी शेतजमिनीत गुंतवलेले भांडवल सुध्दा मिळणे कठीण झाले आहे. परिसरातील दुष्काळी सदृश परिस्थितीची निफाडचे तहसिलदार दिपक पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, कृषि अधिकारी पाटील यांच्यासह महसूल अधिका-यांनी पाहणी करुन पीकस्थितीचा आढावा घेतला.
तळवाडे व परिसरातील गावात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतक-यांनी पेरलेली सोयाबीन,मका,भुईमुग ,बाजरी व इतर खरीपाची पिके पावसाअभावी पुर्णपणे करपून गेली आहेत. सोयाबिन पिक कापणी करून मळणी करणे सुध्दा परवडणारे नसल्याने काही शेतक-यांनी उभ्या सोयाबिन पिकामध्ये जनावरे सोडुन दिली आहेत. परतीच्या पावसानेही यंदा हजेरी लावली नाही. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. यावेळी ग्रामस्थांनी व लोकप्रतिनीधीनी तहसिलदार दिपक पाटील यांच्याकडे दुष्काळ जाहिर करावा व शेतक-यांना मदत द्यावी तसेच गावाला पिण्यासाठी टँकर सुरू करावा अशा मागण्या केल्या. त्यानुसार, तहसिलदार पाटील यांचेसह जि.प. सदस्य सुरेश कमानकर यांनी पीकस्थितीची पाहणी केली. यावेळी तळवाडेचे सरपंच लता सांगळे, राजेंद्र सांगळे महाजनपुरचे बंचवत फड , औरंगपुरचे सोपान खालकर, भेंडाळीच्या संरपच शोभा कमानकर , दिपक कमानकर ,मंडल अधिकारी केदार, कृषी अधिकारी पाटील, कृषी सहाय्यक शेजवळ, यांचेसह तलाठी, ग्रामसेवक आदिसह ग्रामस्त उपस्थित होते.
तीव्र पाणी टंचाई
तळवाडे परिसरात पाऊस अतिशय कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे परिसरांत तीव्र पाणी टंचाई आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.शासनाने तात्काळ दुष्काळ जाहिर करून शेतक-यांना मदत करावी.
- लता राजेंद्र सांगळे, सरपंच, तळवाडे