वाळू माफियांकडून तलाठ्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:01 AM2017-11-07T01:01:23+5:302017-11-07T01:01:35+5:30
अवैध वाळूची वाहतूक करताना वारंवार तलाठ्याकडून कारवाई केली जात असल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी सोमवारी सकाळी कार्यालयात जाणाºया तलाठ्याला एकटे गाठून प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांडके व लोखंडी टॉमीने केलेल्या बेदम मारहाणीत तलाठी यादव बच्छाव गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने तलाठी कर्मचाºयांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : अवैध वाळूची वाहतूक करताना वारंवार तलाठ्याकडून कारवाई केली जात असल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी सोमवारी सकाळी कार्यालयात जाणाºया तलाठ्याला एकटे गाठून प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांडके व लोखंडी टॉमीने केलेल्या बेदम मारहाणीत तलाठी यादव बच्छाव गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने तलाठी कर्मचाºयांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात सर्रासपणे चोरीची वाळू आणली जात असून, मध्यरात्री अथवा पहाटेच्या सुमारास वाळू माफियांकडून राज्य व राष्ट्रीय महामार्गाचा त्यासाठी वापर केला जातो. एकट्या दुकट्या तलाठ्याने वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे वाळू माफियांची मुजोरी वाढली असून, त्यातूनच सोमवारचा प्रकार घडला. गेल्या महिन्यात नाशिक तहसीलदार कार्यालयातील भरारी पथकाने नासर्डी पुलाजवळील शिवाजीवाडी येथून वाळू घेऊन जाणारा मालट्रक संशयावरून अडविला असता, वडनेरदुमालाचे तलाठी यादव विठ्ठल बच्छाव (३५) यांनीच सदरचा मालट्रक अडवून त्याचा पंचनामा केला होता. सदर मालट्रकमध्ये वाळू होती त्याबाबतचे कोणतीही कागदपत्रे चालक व गाडीमालक सादर न करू शकल्याने सदरचा मालट्रक सील करून शिवाजीवाडी येथेच महसूल खात्याने उभा केलेला असून, तेव्हापासूनच वाळू माफिया तलाठी यादव बच्छाव यांच्या मागावर होते. बच्छाव हे अशोका मार्गावर राहतात सोमवारी सकाळी ८ वाजता ते भाजीपाला घेण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल (जुने नागजी रुग्णालय) कडून दुचाकीवर जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोघांनी बच्छाव यांना अडविले व काही विचारपूस करण्यापूर्वीच मारहाण करण्यास सुरुवात केली. संबंधितांकडे लाकडी दांडुके व लोखंडी गज असल्याचे पाहून बच्छाव जिवाच्या भीतीने रस्त्याने पळत सुटले. परंतु हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून रस्त्यात गाठले व बेदम मारहाण केली. सकाळची वेळ असल्याने बच्छाव यांच्या मदतीला लवकर कोणी आले नाही, तोपर्यंत हल्लेखोरांनी त्यांना यथेच्छ मारहाण करून पलायन केले. या घटनेचे वृत्त कळताच तलाठी संघटनेच्या पदाधिकाºयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बच्छाव यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहे.