धक्काबुक्की : सातपूरला पोलीस पथकासमोर चोरीचा माल खरेदी करणा-यांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 08:58 PM2018-02-08T20:58:41+5:302018-02-08T21:12:28+5:30
रामदास पालवे याने आक्रमक होत गांगुर्डे यास खाली पाडून त्याच्या मानेवर पाय दाबून धरत ‘तू इथे मरुन जा, पोलिसांनी तुला ठार केले, असे मी सांगतो’ असा दम देण्यास सुरूवात केली. यावेळी घरातील महिला, पुरूष तसेच समोरील देविदास अहिरे व त्यांच्या मुलगा असे सर्व जमले व आरडाओरड सुरू केली.
नाशिक : घरफोडीमधील संशयित गुन्हेगारास सोबत घेऊन दडविलेला चोरीचा माल जप्त करण्यासाठी सातपूर पोलीस ठाण्याचे पथक प्रबुध्दनगर परिसरात झाडाझडतीसाठी पोहचले. ज्यांना चोरीच्या वस्तू विकल्या त्यांची घरे शोधताना पालवे कुटुंबियाच्या घराजवळ पोलीस पोहचले. या ठिकाणी संशयित व्यक्ती व त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांची वाट अडवून महिला पोलीस कर्मचाºयांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रबुध्दनगरमध्ये विठ्ठल पालवे नामक व्यक्तीच्या घरात पोलीस झाडाझडतीसाठी पोहचले. या घरातील अनिल पालवे याने घरफोडीतील संशयित आरोपी महेश शिरसाठकडून चोरीचा मोबाईल खरेदी केला होता. दरम्यान विठ्ठल याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत तपासात सहकार्य केले नाही. यावेळी एक संशयित घरामध्ये पलंगावर झोपलेला पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्यास उठविण्याचा प्रयत्न केला;मात्र त्याने झोपेचे सोंग घेत धारधार शस्त्र स्वत:च्या शरीराने झाक ण्याचा प्रयत्न सुरु केला. हालचालीवरुन पोलिसांचा संशय बळावला व पोलिसांनी त्याला धरुन उठविले असता पलंगावर सुमारे दहा ते बारा इंच लांबीचा मोठा सुरा पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी सदर संशयित अशोक गांगुर्डे (रा. तळवाडे) यास ताब्यात घेत पोलीस वाहनात डांबले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश आखाडे यांच्यासह आदिंनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र रामदास पालवे याने आक्रमक होत गांगुर्डे यास खाली पाडून त्याच्या मानेवर पाय दाबून धरत ‘तू इथे मरुन जा, पोलिसांनी तुला ठार केले, असे मी सांगतो’ असा दम देण्यास सुरूवात केली. यावेळी घरातील महिला, पुरूष तसेच समोरील देविदास अहिरे व त्यांच्या मुलगा असे सर्व जमले व आरडाओरड सुरू केली.
रोखले पोलीस वाहन
संशयित गांगुर्डेला घेऊन जाणारे पोलिसांचे वाहन रोखून महिलांनी पोलीस शिपाई कांदळकर यांना धकलून देत शिवीगाळ केली. दरम्यान, रामदास पालवे याने भींतीवर स्वत:चे डोके आपटले व जखमी अवस्थेत आखाडे यांच्या पोलीस वाहनासमोर झोपून घेतले. यावेळी नियंत्रण कक्षाकडे आखाडे यांनी मदत मागितली. काही वेळेतच महिला पोलिसांचे ‘निर्भया’ सह नियंत्रण क क्षाकडून जादा पोलीसांची मदत घटनास्थळी पाठविण्यात आली. सातपूर पोलीस ठाण्यात विठ्ठल पालवे, रामदास पालवे त्याची पत्नी, देविदास अहिरे व त्यांच्या मुलाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.