दापूरच्या तांगा शर्यतीत राडा : पोलिसांच्या पथकावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 02:05 AM2019-01-22T02:05:16+5:302019-01-22T02:05:36+5:30
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे तेलमाथा परिसरात खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तांगा शर्यतीत बेफाम झालेल्या शौकिन व ...
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे तेलमाथा परिसरात खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तांगा शर्यतीत बेफाम झालेल्या शौकिन व जमावाने वावी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी (दि.२१) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यात वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपुकमार बोरसे, एक शिपाई व पोलीसमित्र जखमी झाले आहेत.
दापूर येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त तेलमाथा परिसरात अनधिकृतपणे तांगा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. गुप्त माहितीच्या आधारे वावी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. वरिष्ठ कार्यालयाकडूनही या शर्यतीबाबत वावी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, उपनिरीक्षक मुख्तार सय्यद, एल. टी. भोसले, हवालदार प्रवीण अढांगळे, सुधाकर चव्हाणके, उमेश खेडकर, प्रकाश उंबरकर, अजित जगधने यांच्यासह पोलीस कर्मचारी शासकीय व खासगी वाहनाने दापूरच्या तेलमाथा परिसरात दाखल झाले. याठिकाणी सुरू असलेल्या तांगा शर्यतीबाबत त्यांची चौकशी करण्यास प्रारंभ करताच शौकिनांनी त्यांना मज्जाव करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर संतप्त झालेल्या शौकिनांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. सुमारे एक हजाराचा जमाव संतप्त झाल्याने उपस्थित पोलीस पथकाला माघार घ्यावी लागली. त्यानंतर संतप्त शौकिनांनी पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक करण्यास प्रारंभ केला.
पोलीस पथक बॅकफुटवर गेल्यानंतरही दगडफेक सुरूच होती. या दगडफेकीत वावी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे व शिपाई सुधाकर चव्हाणके जखमी झाले. बोरसे यांच्या मानेवर दगड लागल्याने मोठी जखम झाली, तर चव्हाणके यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली, तर पोलीसमित्र नारायण घोटेकर यांच्या हाताला गंभीर जखम झाले. जखमींवर दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदतीसाठी तातडीने दंगा नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शौकिनांनी तोपर्यंत आपली वाहने, घोडे व बैल घटनास्थळावरून पळवून नेले होते. मदतीसाठी आलेल्या पोलिसांनी पीकअप जीप व दोन टाटाची छोटी वाहने ताब्यात घेतली आहेत. यात दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र पोलीस फौजफाटा येईपर्यंत शौकिन व जमावाने धूम ठोकली होती.
जखमी बोरसे व अन्य दोघांवर उपचार केल्यानंतर रुग्णालयातून सोडून देण्यात आले. निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वावी पोलीस ठाण्यात घेऊन घटनेची माहिती घेत होते. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम वावी पोलीस ठाण्यात सुरू होते.
वावी पोलिसांनी ताब्यात घेतलेली वाहने.
गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू
अचानक पोलिसांवर तांगा शौकिनांनी दगडफेक केल्याने पोलीस अधिकाऱ्यासह तिघेजण जखमी झाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता. जमाव पसार झाल्यानंतर सर्वजण वावी पोलीस ठाण्यात आल्यानंतर छावणीचे रूप आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीत रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. याप्रकरणी वाहने ताब्यात घेणे व संशयितांची नावे शोधून काढण्याचे काम सुरू होते.