टवाळखोर पोलिसांच्या रडारवर
By admin | Published: November 3, 2015 10:50 PM2015-11-03T22:50:16+5:302015-11-03T22:52:27+5:30
परिमंडळ दोनमध्ये कडक कारवाई : बाइक रायडरवरही कारवाई
इंदिरानगर : भरधाव दुचाकी चालवून स्टंटबाजी करणारे युवक तसेच चौकाचौकात थांबून टवाळखोरी करणारे तरुण पोलिसांच्या रडारवर आले आहेत़ पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनमध्ये सहाशे टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये इंदिरानगर परिसरातील दिडशे टवाळखोरांचा समावेश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे़
पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनमधील पोलीस ठाणे हद्दीत (सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प) पोलिसांनी पायी पेट्रोलिंग सुरू केली असून, नागरिकांसोबत सुसंवाद व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ याबरोबरच परिसरात धूम स्टाइल दुचाकी चालविणारे तसेच चौकाचौकांत बसून टवाळखोरी करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे़ त्यानुसार सोमवारी
(दि़ २) सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इंदिरानगर परिसरात कारवाई करण्यात आली़
गुरुगोविंंदसिंग महाविद्यालय प्रवेशद्वार, पिंगळे चौक राजे छत्रपती चौक यांसह मुख्य चौकात भरधाव दुचाकी चालविणाऱ्या १०१ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ तसेच त्यांच्या पालकांना बोलावून घेत समजावून सांगण्यात आले़ यांनतर चौकाचौकांत उभे राहून टवाळखोरी करणाऱ्या ३६ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली़ या कारवाईमध्ये पोलीस उपायुक्त धिवरेंसह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमत सावंत, सहायक पोलीस निरीक्षक जमील शेख, केतन राठोड यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते़ (वार्ताहर)