घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मिळेल मोफत, राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

By अझहर शेख | Published: May 13, 2023 11:50 PM2023-05-13T23:50:32+5:302023-05-13T23:50:49+5:30

नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांना मोफत,

Radhakrishna Vikhe Patil announced that five brass sands will be provided free of charge for houses | घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मिळेल मोफत, राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मिळेल मोफत, राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

googlenewsNext

अझहर शेख, नाशिक: राज्य शासनाने नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवीन वाळू धोरण लागू केले आहे. जनतेचे सहकार्य लाभल्यास वाळू धोरण निश्चितच यशस्वी होईल. तसेच घरकुलांसाठी लागणारी पाच ब्रास वाळू नवीन धोरणानुसार मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे शनिवारी (दि.१३) गोदावरी नदी खोलीकरण व शासकीय वाळू विक्री डेपोचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, नवीन वाळू धोरणामुळे अवैध वाळू उत्खनन व विक्रीवर अंकुश बसेल. तसेच यामुळे सामान्य नागरिकांना या धोरणानुसार ६०० रूपये ब्रासप्रमाणे वाळू मिळेल. ऑनलाईन पद्धतीने वाळूची खरेदी करता येणार आहे.
याप्रसंगी व्यासपिठावर आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, निफाड प्रांताधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण, निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांच्यासह विविध अधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. शासकीय वाळू विक्री डेपोचे लोकार्पण विखे पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तसेच मधुकर खेलूकर, शाम वायकांडे व जीवन आंबेकर यांना प्रातिनिधीक स्वरूपात ऑनलाइन वाळू वाहतूक पासेसचे वितरणदेखील त्यांनी केले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नवीन वाळू धोरणाची माहिती दिली. तसेच आभारप बाबासाहेब पारधे यांनी मानले.

नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांना मोफत

गोदावरी नदीपात्राच्या खोलीकरणात काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार आहे. या नवीन धोरणामुळे बेकायदेशीर वाळू विक्रीला आळा बसणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी यांनी या नवीन वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर रहावे, अशा सूचनाही महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना याप्रसंगी दिल्या.

पुरस्थिती येईल नियंत्रणात

नवीन वाळू धोरणाच्या माध्यमातून नागरिकांना वाळू स्वस्त दरात उपलब्ध होण्यासोबतच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात गोदावरी नदीला येणाऱ्या पाण्यामुळे चांदोरी, सायखेडा या भागांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणी असलेल्या नदी खोलीकरणामुळे नदीपात्रात साठलेला गाळ काढल्याने पुर परिस्थिती नियंत्रणात येण्यास मोठी मदत होणार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

Web Title: Radhakrishna Vikhe Patil announced that five brass sands will be provided free of charge for houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.