चांदवडच्या अर्धपीठ रेणुका मातेच्या मूर्तीला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:42 PM2018-03-13T15:42:33+5:302018-03-13T15:42:33+5:30

वज्रलेपण : नाशिकच्या मिट्टी फाऊण्डेशनकडून शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया

Radhava, the half-image of Chandwad, is in the image of Renuka Mata | चांदवडच्या अर्धपीठ रेणुका मातेच्या मूर्तीला झळाळी

चांदवडच्या अर्धपीठ रेणुका मातेच्या मूर्तीला झळाळी

googlenewsNext
ठळक मुद्देचांदवड येथील रेणुका माता मंदिराला प्राचीन इतिहास आहे. इ.स. १७३५ ते १७९५ या काळात अहल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलावज्रलेपणानंतर आता मूर्तीचे रुप झळाळले आहे. रंगसंगतीमुळे मूर्तीचे व्यक्तिमत्व अधिकच खुलले आहे

नाशिक - साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून मानल्या जाणा-या चांदवड येथील रेणुका मातेच्या पुरातन मूर्तीला नुकतेच वज्रलेपण करण्यात आल्याने मातेचे सौंदर्य खुलले आहे. नाशिकचेच युवा शिल्पकार मयूर मोरे यांचेसह त्यांच्या मिट्टी फाऊण्डेशनने ही वज्रलेपणाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
चांदवड येथील रेणुका माता मंदिराला प्राचीन इतिहास आहे. इ.स. १७३५ ते १७९५ या काळात अहल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. दगडी गाभा-यात असलेली रेणुका मातेची केवळ शीर असलेली मूर्ती पुरातन आहे. या मूर्तीची होत चाललेली झीज लक्षात घेता रेणुका माता संस्थानने दोन वर्षापूर्वी वज्रलेपणाची प्रक्रिया पार पाडली होती परंतु, त्यात ब-याच त्रुटी राहून गेल्या होत्या. संस्थानच्या विश्वस्तांनी नाशिकच्या सांडव्यावरच्या देवीचे मोहक रुप पाहिले आणि या मूर्तीवर केलेल्या वज्रलेपणाची माहिती घेतली असता, शिल्पकार शांताराम मोरे व त्यांचे सुपुत्र मयूर मोरे यांची नावे समोर आले. शिल्पकलेत पारंगत असलेल्या आणि उच्च शिक्षण घेतलेल्या मयूर मोरे याने मिट्टी फाऊण्डेशन स्थापन केलेली आहे आणि या फाऊण्डेशनमार्फत शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यापासून ते पुरातन मुर्तींचे जतन कसे करावे, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. रेणुका माता संस्थानने मोरे यांच्याशी संपर्क साधला आणि वज्रलेपणाची धुरा त्यांच्या हाती सोपविली. मोरे कुटुंबीयांनी मूर्तीची शास्त्रशुद्ध तपासणी केली. मूर्तीच्या अवतीभवती असलेली आर्द्रता, धुलीकण, पाणी व आम्ल यांचा होणारा थेट संपर्क, भाविकांची दर्शनासाठी कायम असलेली गर्दी, जवळच असलेल्या महामार्गामुळे हवेतील प्रदुषणाची प्रचंड प्रमाणात वाढलेली असंतुलित पातळी आणि त्यामुळे सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साईड व डायक्साइड, व्होलेटाइल आॅरगॅनिक कंपाऊंड, कार्बन मोनाक्साइड, ओझोन यांचा एकत्रित परिणाम होऊन मूर्तीची झीज झाल्याचे निदर्शनास आले. या घटकांमुळे मूर्ती कमकुवत होऊ शकते. मोरे कुटुंबीयांनी सा-या परिस्थितीचा शास्त्रीय आढावा घेत प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. शास्त्रीय पद्धतीने वज्रलेपणाची प्रक्रिया पार पाडली. त्यासाठी तीन दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. वज्रलेपणानंतर आता मूर्तीचे रुप झळाळले आहे. रंगसंगतीमुळे मूर्तीचे व्यक्तिमत्व अधिकच खुलले आहे. या वज्रलेपणासाठी शांताराम मोरे, मयूर मोरे, हर्षद मोरे यांनी रात्रंदिवस काम करत मेहनत घेतली.
असे झाले वज्रलेपण
सुरुवातीला मूळ गाभ्यापर्यंत जाऊन त्यावर मातीचा थर (मड प्लास्टर) दिला गेला. ते एकरूप होण्यासाठी चुन्याचा थर देण्यात आला. त्यामध्ये काळी माती, गढीची पांढरी माती व चिकण माती मिश्रित करत मातीत कठिणपणा येण्यासाठी डिंक, बेलफळ, हिरडा-बेहडा, तांदळाचा भुसा, स्वदेशी गाईचे शेण आदी सेंद्रीय पदार्थ मिसळण्यात आले. संपूर्णत: नैसर्गिक व शास्त्रीय पद्धतीने ही वज्रलेपणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.

अवघड प्रक्रिया यशस्वी

मिट्टी फाऊण्डेशनमार्फत आम्ही ही वज्रलेपणाची अवघड प्रक्रिया यशस्वी पार पाडली आहे. अर्थात, रेणुका मातेच्या आशीर्वादानेच हे सारे घडून आले आहे. पुरातन मूर्तीचे जतन आणि संवर्धनाचे विषय आमच्या फाऊण्डेशनमार्फत हाताळले जातात. त्यातून अनेक पुरातन मुर्तींचे सौंदर्य खुलण्यास मदत झालेली आहे.
- मयूर मोरे, शिल्पकार, नाशिक
 

Web Title: Radhava, the half-image of Chandwad, is in the image of Renuka Mata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक