कोरोनाला हटविण्यासाठी राघवेश्वराला साकडे; मंदिरांमध्ये प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:59 PM2020-03-25T22:59:58+5:302020-03-25T23:00:28+5:30

पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले चिचोंडी खुर्द येथील पुरातन राघवेश्वर महादेव मंदिर येथे दरवर्षी गुढीपाडव्याला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचे संकट दूर सारण्याचे साकडे घालण्यात आले.

Ragheshvara snaps to delete Corona; Prayers in temples | कोरोनाला हटविण्यासाठी राघवेश्वराला साकडे; मंदिरांमध्ये प्रार्थना

कोरोनाचे आरिष्ट्य टळावे यासाठी श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्तमंदिरात प्रार्थना करताना आचार्य प्रवर महंत श्री सुकेणेकरबाबा, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्ण सुकेणेकर, गोपीराज शास्री सुकेणेकर आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देचिचोंडी खुर्दला गुढीपाडव्याची यात्रा रद्द : ग्रामस्थांना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन

जळगाव नेऊर : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले चिचोंडी खुर्द येथील पुरातन राघवेश्वर महादेव मंदिर येथे दरवर्षी गुढीपाडव्याला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचे संकट दूर सारण्याचे साकडे घालण्यात आले.
यात्रा भरण्यास अनेक वर्षांची परंपरा आहे. प्रभू राम वनवासात असताना सीतामातेच्या दर्शनासाठी महादेवाच्या पिंडीची निर्मिती करून पुढे माता अहल्यादेवी होळकर यांनी येथील पुरातन हेमाडपंती मंदिराची उभारणी केली. तेव्हापासून येथे चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवशी दोन दिवस यात्रा भरत असते. मात्र, कोरोनामुळे अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा यात्रोत्सव स्थगित करण्यात आला.
यावर्षी गावातील कुणीही गोदावरी नदीवर पाणी आणण्यासाठी गेले नाही. शिवाय सायंकाळी तकतराव मिरवणूकही काढली नाही, मात्र नागरिकांनी कोरोना विषाणूचे संकट दूर करण्याचे राघवेश्वराला साकडे घातले. यावर्षी घरातच पुरणपोळीचा स्वयंपाक करून ग्रामस्थांनी कुटुंबासोबत गुढीपाडव्याचा सण साजरा केला. सरपंच मनीषा संतोष मढवई, उपसरपंच साईनाथ मढवाई, संतोष मढवई, ग्रामसेवक भाऊसाहेब गायके, आरोग्यसेवक पैठणकर, पुंडलिक मढवई यांनी ग्रामस्थांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
महानुभाव संत-महंतांकडून प्रार्थना
कसबे-सुकेणे : संपूर्ण जगावर कोरोनारूपी आलेले संकट दत्तप्रभूंनी दूर करावे, याकरिता प्रतिगाणगापूर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्तमंदिरात सुकेणेकर गादीच्या महंत व संतांनी विशेष महापूजा केली. दरम्यान मंदिरात गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून ही प्रार्थना करण्यात आली. श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथे कोरोनापासून प्रतिबंधक उपाय म्हणून दत्तमंदिर बंद ठेवले आहे. जगभरातील कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीचे ठिकाणे नियंत्रित करण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार संस्थानने हा निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंदिरातील उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर महंत सुकेणेकरबाबा शास्री यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद्भगवतगीता व श्री दत्तात्रेय कवच यांचे पारायण व नामस्मरण करीत धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्ण सुकेणेकर, गोपीराज शास्री सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, अविराज सुकेणेकर, चितांमनबाबा वैरागी व भक्तपरिवार उपस्थित होता.

Web Title: Ragheshvara snaps to delete Corona; Prayers in temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.