‘रहे ना रहे हम’ संगीत मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:20 AM2019-08-29T01:20:46+5:302019-08-29T01:21:04+5:30
गायकाने संगीतकाराच्या भावना उतरविण्याच्या प्रयत्नातून योग्य वापर केल्यास गायनातून भावना प्रकटतात. त्यासाठी संगीतकार आणि गायक यांनी मिळून गाण्याचा संसार रचणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करतानाच लेखिका व चित्रपट संगीत अभ्यासक मृदुला दाढे-जोशी यांनी मदन मोहन, जयदेव यांच्यासारख्या संगीतकारांचा संक्षिप्त स्वरूपात सौंदर्यशास्त्रीय मागोवा घेऊन विविध गीतांमागील संगीतकारांचे भावविश्व रसिकांसमोर उलगडून दाखविले.
नाशिक : गायकाने संगीतकाराच्या भावना उतरविण्याच्या प्रयत्नातून योग्य वापर केल्यास गायनातून भावना प्रकटतात. त्यासाठी संगीतकार आणि गायक यांनी मिळून गाण्याचा संसार रचणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करतानाच लेखिका व चित्रपट संगीत अभ्यासक मृदुला दाढे-जोशी यांनी मदन मोहन, जयदेव यांच्यासारख्या संगीतकारांचा संक्षिप्त स्वरूपात सौंदर्यशास्त्रीय मागोवा घेऊन विविध गीतांमागील संगीतकारांचे भावविश्व रसिकांसमोर उलगडून दाखविले.
शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात शनिवारी (दि.२४) पुष्प मृदुला दाढे यांनी गुंफले. ‘रहे ना रहे हम : आस्वाद चित्रपट संगीताचा’ या विषयावर बोलताना त्यांनी ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन तसेच जयदेव यांच्यासह काही दिग्गज संगीतकारांचा जीवनप्रवास उलगडून दाखवला. त्या म्हणाल्या, संगीतकार मदन मोहन म्हणजे कारुण्याचा निरंतर झरा होते. यावेळी त्यांनी मदन मोहन यांची लग जा गले, जो दास्ताँ हमने सुनाई, तेरी आँखोके सिवा दुनिया में रखा क्या है, जमी से हमे आसमाँ पे यांसारख्या गाण्यांच्या गायकीतून स्वरांचे आणि संगीताचे विविध पदर उलगडून दाखवले. संगीतकार जयदेव यांचा अंतीम काळ सुखकर नसला तरी त्यांच्याविषयी आजही ज्याप्रमाणात चर्चा होते हेच त्यांचे यश असल्याचे नमूद करताना त्यांच्या रातभर दर्द की शमा जलती रही, तुम्हे हो ना हो मुझको तो इतना यकीं है आदी गीतांच्या गायनातून त्यांनी स्वर व सुरांचे विविध पदर उलगडून दाखवले. त्यांना अथर्व वारे व ईश्वरी दसककर यांनी साथसंगत केली. यावेळी जयप्रकाश जातेगावकर, रोहन चंपानेरकर व आशिष कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन वंसत खैरनार यांनी केले.