अनुभवला स्वरांचा 'तेजोनिधी लोहगोल'; प्रमोद महाजन उद्यानात रंगली राहुल देशपांडे यांची मैफल
By धनंजय रिसोडकर | Published: October 27, 2022 12:32 PM2022-10-27T12:32:24+5:302022-10-27T12:32:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अलबेला सजन आयो री.. दिल की तपीश है आज आफताब' पासून 'तेजोनिधी लोहगोल, भास्कर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अलबेला सजन आयो री.. दिल की तपीश है आज आफताब' पासून 'तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज ' अशा रागदारीवर आधारित चीजांसह ' कानडा राजा पंढरीचा आणि तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' अशा भक्तीगीतांनी नाशिककरांच्या दीपोत्सवाच्या पर्वाची सुरेल सांगता झाली.
आमदार देवयानी फरांदे यांच्या वतीने
आयोजित मैफलीसाठी प्रमोद महाजन उद्यान ओसंडून वहात होते. पारंपरिक पेहरावत आलेल्या रसिक महिला आणि पुरुषांनी महाजन उद्यानाचा एका टोकापासून ते पार खेळण्यांपर्यंतच्या दुसऱ्या टोकापर्यंत मैदान रसिकांनी फुलले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राहुल देशपांडे यांनी वसंत बुखारी या दोन रागांचा संगमातून साकारलेली 'कित हो गये बनवारी' ही चीज सादर केली. रागदारी संगीतामधील स्वरांची ताकत त्यांनी अलबेला सजन आयो री मधून दाखवून दिले. त्याशिवाय कट्यार काळजात घुसली चित्रपटातील तेजो निधी लोहगोल तसेच तुजं मागतो मी आता या गीताच्या चालीवरील हिंदी रचना तसेच छोटासा साया था या हिंदी गाण्यावरील राग सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राम राम जप करी सदा हे भजन तसेच तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आणि कानडा राजा पंढरीचा यासह विठ्ठल नामाचा गजर करीत कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना तबल्यावर निखिल फाटक संवादिनी व मिलिंद कुलकर्णी, कीबोर्डवर अमन वरखेडकर आणि साईड रिदम रोहन वनगे यांनी साथसंगत केली. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी मनोगत व्यक्त करताना नाशिकच्या जिल्हा क्रीडा संकुलासह, अभिनव भारत मंदिर स्मारकाची उभारणी तसेच प्रमोद महाजन उद्यान, तरणतलावांचे नूतनीकरण अशा विविध प्रकल्पांची माहिती दिली. कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.