राहुलनगर बुडाले शोकसागरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:30 AM2019-02-25T01:30:37+5:302019-02-25T01:30:53+5:30
जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला.
नाशिक : जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला. अगदी घराला घरे लागून असलेल्या चार घरांमधील कुणा ना कुणी अपघातात मरण पावल्याने येथील प्रत्येकाचा शोक अनावर झाला होता. अवघ्या सहा महिन्यांचे बाळही या अपघात दगावल्याने बाळाच्या वडिलांच्या आक्रोशाने साऱ्यांचेच हृदय हेलावले. मन सुन्न करणाºया या घटनेमुळे संपूर्ण नाशिकरोड परिसरात शोककळा पसरली आहे.
टाकळीतील राहुलनगर परिसरातील स्वप्नील कांडेकर यांच्या घरी त्यांचा मुलगा त्रिशाल याच्या जावळ काढण्याचा कार्यक्रम होता. राहुलनगर परिसरात कांडेकर, डांगे, लोंढे आणि गवळी, कुटुंबीय अगदी जवळच राहतात. कोणत्याही कार्यक्रमासाठी हे कुटुंबीय एकत्र येतात. जावळाच्या कार्यक्रमासाठीदेखील सर्वच आयशर टेम्पोने केदराईदेवस्थानकडे निघाले होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत शिवारात दोन आयशर गाड्यांमध्ये समोरासमोर अपघात झाल्याने या कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये सुशीला सुरेश गवळी (६६), निवृत्ती रामभाऊ लोंढ (५०), शोभाबाई सूर्यवंशी (६०), सुदाम पाटणकर (६६), सुंदराबाई आनंदा कांडेकर (८०) आशा दत्तात्रय कांडेकर (४७) समृद्धी मनीष डांगे (सहा महिने) यांना काळाने हिरावून घेतले. यातील बहुतांश कुटुंबीय हे राहुलनगर परिसरातच वास्तव्यास आहेत. या अपघातात एकाच कुटुंबातील सासू-सुनेचा मृत्यू झाला. तर अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीलाही काळाने हिरावून नेल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
सातत्याने वर्दळ आणि गजबजलेल्या टाकळी परिसरात रविवार सकाळपासून स्मशानशांतता पसरली होती. संपूर्ण राहुलनगर परिसरात काळाची गडद छाया पसरली होती.
घटनेचे वृत्त कळताच राहुल दिवे, प्रशांत दिवे, रवी पगारे, सचिन साळवे, नगरसेवक अनिल ताजनपुरे, आशा तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. राहुलनरमध्ये जाऊन त्यांनी उर्वरित कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
अपघातात आशा दत्तात्रय कांडेकर यांच्यासह त्यांच्या सासू सुंदराबाई कांडेकर व आई सुशीला सुरेश गवळी यांचा मृत्यू झाला.
पत्नीची साथ सुटली
सूर्यवंशी दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने ते राहुलनगरमध्येच आपल्या भाच्याच्या आश्रयाने राहत होते. अपघातात शोभा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने एकाकी पडलेल्या सूर्यवंशी यांना धक्का बसला आहे.
सर्वांचाच प्रवास
ठरला अखेरचा
घरातील कोणत्याही कार्यासाठी एकत्र जाणाºया कुटुंबीयांचा रविवारचा प्रवास अखेरचा ठरला.