बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा ; दोघा संशयितांना अटक ; उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:07 AM2017-11-14T01:07:45+5:302017-11-14T01:10:48+5:30
आडगाव शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मिती कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला़ या छाप्यामध्ये गोरख भीमाजी ढेरिंगे (३४, रा. पळसे) व विलास भानुदास थोरात (३९, रा. कोनार्कनगर) या दोन संशयितांना अटक करण्यात आली.
नाशिक : आडगाव शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मिती कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला़ या छाप्यामध्ये गोरख भीमाजी ढेरिंगे (३४, रा. पळसे) व विलास भानुदास थोरात (३९, रा. कोनार्कनगर) या दोन संशयितांना अटक करण्यात आली. या ठिकाणाहून विविध नामांकित कंपनींचा सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे सुमित राजेश बागडे (रा. कोणार्कनगर) आणि संदीप बाजीराव जाधव (रा. पळसे, ता. जि. नाशिक) हे दोन संशयित फरार झाले असून, अनेक दिवसांपासून हा कारखाना सुरू असल्याचे समोर आले आहे़ शहरात बनावट मद्यनिर्मिती केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती़ त्यानुसार विभागीय भरारी पथकाने शनिवारी (दि़११) रात्री आडगाव शिवारात कोणार्क मधील बालाजीनगर येथे पथकासह छापा टाकला़ या ठिकाणी संशयित गोरख ढेरिंगे आणि विलास थोरात हे मद्यनिर्मिती करीत होते, तर त्यांचे साथीदार बागडे व जाधव हे कारवाईची चाहूल लागताच फरार झाले़
या मद्यनिर्मिती कारखान्यात मध्य प्रदेश निर्मित व राज्यात बंदी असलेल्या बॉम्बे स्पेशल व्हिस्की, मॅकडॉवेल, बॅगपायपर, आॅफिसर चॉईस, डिप्लोमेट या विदेशी मद्यांसह प्रिन्स संत्रा या देशी दारूचा साठा आढळून आला़ तसेच बनावट निर्मितीसाठी वापरण्यात येणारी विविध साहित्य, प्लॅस्टिक ड्रम, टोचे, चाकू व मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी डीओ (एमएच १५, इएन ८६६७) दुचाकी असा सुमारे १ लाख १५ हजार १८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
७५ हजारांचे मद्य जप्त
सुरगाणा तालुक्यातील कुकडणे शिवारातील एका घरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून दमन निर्मित ७५ हजार १२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला़ त्यामध्ये किंगफिशर स्ट्रॉँग बिअरचे ११ बॉक्स, जॉन मार्टिन प्रीमिअम व्हिस्कीचे ४ बॉक्स, इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्की ४ बॉक्सचा समावेश आहे.