नाशिकमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 09:40 AM2019-04-08T09:40:16+5:302019-04-08T09:51:16+5:30
सटाणा नाका येथील एकता जिमखान्यास लागून असलेल्या गोदामात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने मध्यरात्री छापा टाकला. 24 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
मालेगाव - सटाणा नाका येथील एकता जिमखान्यास लागून असलेल्या गोदामात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने मध्यरात्री छापा टाकला. 24 जणांना अटक करण्यात आली आहे. जुगाऱ्यांकडून एक लाख 90 हजारांची रोकड, 10 दुचाकी, एक रिक्षा, 24 मोबाईल असा 7 लाख 82 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपाचे माजी महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल गायकवाड यांच्यावर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सटाणा नाका लगतच्या एकता जिमखान्याला लागून असलेल्या गोदामात मोठा जुगार चालू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पो.नाईक शरद देवरे, दिनेश पवार, अभिमन्यू भिलावे, पोलीस शिपाई देविदास ठोके, महादु माळी, सुभाष निकम, समाधान सानप, पंकज गुंजाळ, राहुल अहेर,रणजित सोळुंके यांच्या पथकाने छापा टाकला. सदर कारवाईत जुगाऱ्यांकडुन 1 लाख 90 हजार 390 रुपये रोख,10 मोटरसायकल, एक रिक्षा व 24 मोबाइल असा एकुण 7 लाख 82 हजार 890 रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल गायकवाड व त्यांच्या बंधुंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या भावास अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचे वारो वाहत असताना करण्यात आलेल्या या कारवाईत गायकवाड बंधुंचे नाव आल्याने राजकिय चर्चेला उधाण आले आहे.