घोटेवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 02:05 PM2021-05-20T14:05:12+5:302021-05-20T14:05:32+5:30
सिन्नर: तालुक्यातील घोटेवाडी येथे अवैध दारु अड्ड्यावर महसूलच्या पथकाने धाड टाकून दारु विक्रेत्यास १० हजारांचा दंड ठोठावल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.
सिन्नर: तालुक्यातील घोटेवाडी येथे अवैध दारु अड्ड्यावर महसूलच्या पथकाने धाड टाकून दारु विक्रेत्यास १० हजारांचा दंड ठोठावल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. महसूल पथकाने वावी पोलिसांना या कारवाईची माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोलिस पथक पाठवून दारु विक्रेत्याकडील मुद्देमाल जप्त करीत त्याच्यावर अवैध दारु बाळगुन त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
घोटेवाडी येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून गेल्या १३ दिवसात ६ जणांचा बळी गेला आहे. तर २० रुग्ण बाधीत असून गावात आणखीही अनेकजणांना या आजाराची लक्षणे दिसून येत आहे. अशा बिकट परिस्थितीत येथील अवैध दारु अड्ड्यावर परिसरातील गावांच्या रहिवांशांची दारु घेण्यासाठी होणारी गर्दी कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याची तक्रार तहसीलदार राहूल कोताडे आणि वावी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने केली होती. बुधवारी सदर अवैध दारु अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी धाडले असता तेथे अवैध दारु विक्री सुरु असल्याचे दिसून आले. नायब तहसीलदार ललिता साबळे यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या बिटचे हवालदार दशरथ मोरे, नितीन जगताप, भास्कर जाधव, गोविंद सुरेवाड यांना घटनास्थळी पाठवले. कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करुन अवैधरित्या दारु विक्री केल्याप्रकरणी सदर दारु विक्रेता भाऊराव रामचंद्र सरोदे (३६) यास १० हजारांचा दंड ठोठावला. दरम्यान, वावी पोलिसांनी मुद्दे माल जप्त केला असून अवैध दारु बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.