शहरातील अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:49+5:302021-01-08T04:44:49+5:30
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानंतर शहरातील परिमंडल-१ व २च्या हद्दीत अवैधरीत्या दारू, जुगार, मटक्याच्या अड्ड्यांवर पोलिसांनी अचानकपणे बुधवारी ...
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानंतर शहरातील परिमंडल-१ व २च्या हद्दीत अवैधरीत्या दारू, जुगार, मटक्याच्या अड्ड्यांवर पोलिसांनी अचानकपणे बुधवारी मध्यरात्री जोरदार धाडी टाकल्या. उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात यांच्या नेतृत्वाखाली आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, मुंबई नाका, गंगापूर, सातपूर, इंदिरानगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसह गुन्हेशाेध पथकांनी आपापल्या हद्दीत अवैध दारू विक्री, जुगार अड्ड्यांचा शोध घेत कारवाई केली. महाराष्ट्र जुगार कायदा कलम व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये कारवाई करत शहरातील २४ अवैध धंद्यांवर टाच आणली. यावेळी जुगार खेळताना व मद्यविक्री करताना आढळून आलेल्या संशयितांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये ६३ हजारांचा मद्यसाठा, जुगाराच्या गुन्ह्यांमध्ये ३८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच सिगारेट, तंबाखू उत्पादने अधिनियम २००३सह सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ सुधारणा नियम २०१४ नुसार ७६०० रुपये किमतीचा तंबाखू, सिगारेटचा बेकायदेशीर मालाचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
---इन्फो--
अवैध अड्डे कायमस्वरूपी बंद व्हावेत
शहरातील अवैध दारूविक्रीचे अड्डे असो किंवा जुगार अड्डे असो हे कायमस्वरूपी बंद व्हावे, अशीच नाशिककरांची अपेक्षा आहे. कारण, या अड्ड्यांमुळे गुंडांना बळ मिळत असून, शहरात गुन्हेगारी फोफावत चालली आहे. अवैध धंद्यांविरोधी पोलिसांनी पुन्हा मोहीम हाती घेतली असली तरी ही मोहीम कायम सुरू रहावी आणि महसूल, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या यंत्रणेनेही शहरातील दारू विक्रीचे अड्डे आणि त्यांच्याकडे असलेले परवाने तपासावे, तसेच जुगार अड्ड्यांबाबतही तपासणी महसूलच्या संबंधित लॉटरी विभागाकडून करण्याची मागणी होत आहे. अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई फार्स ठरू नये, असे नाशिककरांचे म्हणणे आहे.