रेल्वेचा झटका; आरक्षणात घट

By Admin | Published: November 12, 2016 01:47 AM2016-11-12T01:47:52+5:302016-11-12T01:52:09+5:30

चपराक : रेल्वे आरक्षणाचा मार्गही झाला खडतर

Rail shock; Decrease in reservation | रेल्वेचा झटका; आरक्षणात घट

रेल्वेचा झटका; आरक्षणात घट

googlenewsNext

 मनोज मालपाणी  नाशिकरोड
रेल्वे तिकीट आरक्षण करून काळा पैसा पांढरा करण्याची शक्कल लढविणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाने चांगलीच चपराक दिली आहे. संबंधितांनी केलेले आरक्षण रद्द करताना काही निर्बंध घातल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर एकाच दिवसांत ६५ टक्के आरक्षणात घट झाली आहे.
केंद्र शासनाने मंगळवारी रात्री चलनातुन ५०० व एक हजाराच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली. मात्र प्रवासी, रूग्ण, सर्वसामान्य आदिंची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्राचे ९, १० व ११ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत रेल्वे तिकीट, आरक्षण कार्यालय, विमानतळ, शासकीय रुग्णालय आदि ठिकाणी चलनातून बाद ठरलेल्या ५०० व १ हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याची घोषणा केली होती. केंद्राने ५०० व एक हजाराच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर बुधवारी एक दिवस बॅँक बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे बहुतेक जण आपल्या जवळील ५०० व १ हजाराची नोट खपविण्याच्या विविध क्लृप्त्या वापरत होते.
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत आरक्षण केंद्र सुरू असते. तर रात्री ८ ते १० पर्यंत आरक्षणाची एकच खिडकी सुरू असते. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दररोज ६ ते ८ लाख रुपयांचे सरासरी तिकीट आरक्षण होते. तसेच आगामी दोन ते चार महिन्यांनी सुटीचा कालावधी असेल तर ८ ते १० लाख रुपयांचे तिकीट आरक्षण होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मंगळवारी १० लाख ५ हजार रुपयांचे तिकीट आरक्षण झाले होते; मात्र पाचशे व एक हजाराच्या नोटा रद्दबातल करण्याचे जाहीर केल्यानंतर बुधवारी अचानक तिकीट आरक्षणामध्ये मोठी वाढ होत १६ लाख ८४ हजारांचे तिकीट आरक्षण झाले आहे. पाचशे व एक हजाराची नोट तिकीट आरक्षणासाठी वापरून कालांतराने ते आरक्षण रद्द करून आपला काळा पैसा पांढरा करण्याचे स्वप्न काहीजणांनी उराशी बाळगले होते; मात्र केंद्र व रेल्वे प्रशासनाने ९, १० व ११ नोव्हेंबर रोजी १० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे तिकीट आरक्षण असेल तर त्यांचा रिफंड आरक्षण खिडकीवर मिळणार नाही असे जाहीर केले. त्याकरिता संबंधितांना ते तिकीट आरक्षण टीसी कार्यालयात जमा करून त्यांना तिकीट डिपॉझिट रिसीट (टीडीआर) भरून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्य संबंधित प्रवाशाच्या नावाने रिफंडचा धनादेश त्यांच्या घराच्या पत्त्यावर पाठविण्यात येणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. ‘चोर पे मोर’ अशी केंद्र व रेल्वे प्रशासनाने भूमिका घेतल्याने बुधवारच्या मानाने तिकीट आरक्षणात ६५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. बुधवारी नाशिकरोडला १६ लाख ८४ हजाराचे तिकीट आरक्षण झाले होते. तर गुरुवारी तिकीट आरक्षण ८ लाख ३३५ रुपयांचे झाले आहे. तर शुक्रवारी सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत फक्त साडेपाच लाखांचे तिकीट आरक्षण झाले आहे. मोदी शासनाने काळ्याचा पांढरा करणारा हा रस्तादेखील बंद केल्याने तिकीट आरक्षण नियमित झाल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Rail shock; Decrease in reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.