रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:10+5:302021-03-19T04:14:10+5:30
नाशिक : एमपीएससी परीक्षांच्या आयोजनाचा खेळ संपत नाही तोच आता ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणखी एक पेच निर्माण ...
नाशिक : एमपीएससी परीक्षांच्या आयोजनाचा खेळ संपत नाही तोच आता ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे. २१ मार्चला ‘एमपीएससी’ची परीक्षा होत असताना याचदिवशी रेल्वेचीही परीक्षा आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना यातील एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
एमपीएससी परीक्षेच्या आयोजनावरून गेल्या आठवड्यापासून गोंधळ सुरू आहे. याआधी १४ मार्चला होणारी ही परीक्षा एमपीएससीने अचानक पुढे ढकलली. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणारे हजारो तरूण महाराष्ट्रातील विविध शहरात रस्त्यावर उतरले. शासनाने याची त्वरित दखल घेत दुसऱ्याच दिवशी परीक्षेची तारीख जाहीर केली. गेल्या वर्षभरात कोरोनाचे कारण देत एमपीएससीने ही परीक्षा तीनवेळा पुढे ढकलली आहे. त्यामुळे तयारी करणारे विद्यार्थी पुरते वैतागले आहेत. अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर अनेकांना वयोमर्यादा अडचण ठरत आहे. आता एकदाची २१ मार्चला ही परीक्षा होत आहे. परंतु, त्याआधीच रेल्वे विभागाने त्यांची परीक्षा जाहीर केलेली असून, ती परीक्षा २१ मार्चला आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला असून, रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची अशा दुहेरी संकटात विद्यार्थी सापडले आहेत.
--
दोन्ही परीक्षा - २१ मार्च
एमपीएससीसाठी विद्यार्थी - १८,०२३
परीक्षा केंद्र - २४
--
रेल्वेची परीक्षा ऑनलाईन
रेल्वेची ३२ हजार २०८ जागांसाठीच ही परीक्षा आधीच जाहीर झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही परीक्षा ऑनलाईन होते. नाशिक जिल्ह्यातून सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे.
केंद्रांवर पोहोचण्यासाठी कसरत
कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना विद्यार्थ्यांना केंद्रांवर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रावर तपासणी करूनच आत सोडले जाणार आहे.
--
परीक्षांच्या आयोजनात प्रारंभीपासून मोठा घोळ सुरू आहे. अनेक उमेदवारांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आहे. मात्र, मागील दोन वर्षे परीक्षाच झाल्या नाहीत आणि आता परीक्षा जाहीर होऊन त्या होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने अनेक परीक्षार्थींना एकाच परीक्षेचा पर्याय निवडावा लागणार आहे.
रवींद्र जाधव, परीक्षार्थी
--
आयोगाने एमपीएससी परीक्षांच्या आयोजनाबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. एकाच वेळी दोन परीक्षा येणार नाहीत, याविषयी काळजी घेेणे आवश्यक होेते. आता रेल्वेची आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थींचा गोंधळ उडणार आहे.
- श्वेता पवार, परीक्षार्थी
--
कोरोनाचे कारण देत १४ मार्चची परीक्षा रदद् केल्याने परीक्षांर्थींचे नियोजन कोलमडले आहे. आता नवीन नियोजनानुसार एमपीएससीची आणि रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी होणार असेल तर दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एकाच परीक्षेचा पर्याय निवडावा लागणार आहे.
- अमर गुंजाळ, परीक्षार्थी