नाशिकरोडचे रेल्वे रुग्णालय ऑक्सिजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:11+5:302021-05-16T04:14:11+5:30
नाशिकरोड : रेल्वे प्रशासन खाजगीकरणाच्या माध्यमातून विविध अत्याधुनिक सेवा देत कात टाकत असताना दुसरीकडे मात्र नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील वैद्यकीय ...
नाशिकरोड : रेल्वे प्रशासन खाजगीकरणाच्या माध्यमातून विविध अत्याधुनिक सेवा देत कात टाकत असताना दुसरीकडे मात्र नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील वैद्यकीय सेवा ही केवळ एकाच डॉक्टराच्या भरवशावर असल्याने रेल्वेच्या वैद्यकीय सेवेला ऑक्सिजन देण्याची वेळ आाली आहे.
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून अप डाऊन दोन्ही मार्गांनी एकूण ४० रेल्वे धावत आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून दररोज किमान सध्या १० ते १५ हजार प्रवासी ये जा करतात. नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या बाजूला रेल्वे दवाखाना असून गेल्या वर्षभरापासून तेथे कंत्राटी पद्धतीने केवळ एकमेव डॉक्टर सेवा देत आहे. तसेच एकलहरारोड कर्षण मशीन कारखान्यात असलेल्या रुग्णालयात देखील कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रेल्वे स्थानकावरील डॉक्टरावरच या रुग्णालयाची भिस्त आहे.
----
१५०० कामगारांसाठी एकमेव डॉक्टर
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील रुग्णालयात घोटीपासून ते निफाड पर्यंत कार्यरत असलेले रेल्वे अधिकारी, कर्मचारी उपचारासाठी येत असतात. घोटीपासून निफाडपर्यंत व कर्षण मशीन कारखान्यातील असे जवळपास १५०० अधिकारी कामगार कार्यरत आहेत तसेच जवळपास एक हजार सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी हे देखील आपल्या कुटुंबीयांसह रेल्वेस्थानकावरील रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे सध्या उपचारासाठी रुग्णालयात मोठी गर्दी होत असून तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडला आहे. रेल्वे रुग्णालयातील दोन्ही परिचारिका काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे भुसावळ येथून एका परिचारिकेला पाचारण करण्यात आले आहे.
-----
उपचार सेवा रामभरोसे
रेल्वेस्थानकावरील रुग्णालयात केवळ एकमेव डॉक्टर सेवा देत असल्याने २४ तास वैद्यकीय सेवा देणे अशक्य आहे. प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाला काही त्रास झाल्यास त्याने तिकीट तपासनीस अथवा ट्यूटर वर माहिती दिल्यास रात्री-अपरात्री त्या प्रवाशाला प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा मिळणे दुरापास्त आहे. अशावेळी संबंधित प्रवाशाला काय त्रास होतो आहे याची माहिती फोनवरून घेऊन ती रेल्वे स्थानकात आल्यावर एखादा कर्मचारी अथवा हमालामार्फत प्रवाशाला औषधे दिली जातात. रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता रेल्वे रुग्णालयात किमान तीन ते चार डॉक्टर व नऊ, दहा परिचारिकांची गरज आहे.
(फोटो १५ रूग्णालय) - नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या बाजूला असलेले रेल्वे रुग्णालय