रेल्वे जंक्शन : मनमाड स्थानकावर प्रवाशांना हकनाक मनस्ताप

By admin | Published: July 25, 2014 10:53 PM2014-07-25T22:53:04+5:302014-07-26T00:50:03+5:30

विश्रामगृह की जनावरांचा गोठा !

Railway junction: Passengers get rid of Manmad at Manmad station | रेल्वे जंक्शन : मनमाड स्थानकावर प्रवाशांना हकनाक मनस्ताप

रेल्वे जंक्शन : मनमाड स्थानकावर प्रवाशांना हकनाक मनस्ताप

Next

गिरीश जोशी ल्ल मनमाड
मनमाड जंक्शन स्थानकातील द्वितीय श्रेणी विश्रामगृहातील मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे प्रवासीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. नेहमीच गायी, बैल, कुत्र्यांचा या ठिकाणी वावर असल्याने विश्रामगृह नव्हे हा, तर जनावरांचा जंक्शन गोठा, असे म्हणण्याची वेळ प्रवासीवर्गावर आली आहे.
मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या स्थानकावरून दररोज सुमारे ८० प्रवासी गाड्या जा-ये करतात. देशाच्या चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे रात्रंदिवस प्रवाशांची येथे वर्दळ असते. अनेक प्रवाशांना मनमाड रेल्वेस्थानकावरून गाडी बदलावी लागते. गाडी येण्यास उशीर असला तर प्रवाशांना आराम करता यावा या हेतूने रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ द्वितीय श्रेणी विश्रामगृह असून, प्रवाशांची नेहमी येथे वर्दळ असते. जवळच असलेले तिकीट घर, आरक्षण खिडकी या ठिकाणी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात.
या विश्रामगृहात मोकाट जनावरांचा नेहमी वावर असतो. मोकाट जनावरांच्या वास्तव्यामुळे या विश्रामगृहाला गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विश्रामगृहात ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या हे या जनावरांचे खाद्य ठिकाण असल्याने या कुंड्यामधील कचरा खाली पसरून घाणीचे साम्राज्य पसरते. गायी, गोऱ्हे यासारख्या मोकाट जनावरांबरोबरच मोकाट कुत्र्यांचाही येथे मुक्त वावर असतो. तिकीट खिडकीच्या समोर अनेक कुत्रे झोपलेले असल्याचे पहावयास मिळते.
अनेकवेळा तिकीट काढताना प्रवाशांचा घाईगर्दीमध्ये या कुत्र्यांवर पाय पण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनावरांच्या शेणामुळे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य येथे पसरलेले असते.
पावसाळ्यात तर बाहेर पाऊस सुरू झाल्यावर रेल्वेस्थानक परिसरातील अनेक जनावरे निवाऱ्यासाठी विश्रामगृहाचा आश्रय घेतात. जनावरांच्या या मुक्त संचारामुळे रेल्वे विश्रांतीगृहाला गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नेहमीच असलेल्या अस्वच्छतेमुळे प्रवासीवर्गाला येथे थांबणे अवघड होत असते.
रेल्वेस्थानकावरील स्वच्छत ेबाबत रेल्वे प्रशासनाकडून फारशी काळजी घेण्यात येत नाही. त्यातच मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे घाणीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रवासीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.

Web Title: Railway junction: Passengers get rid of Manmad at Manmad station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.