रेल्वे, एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 06:40 PM2021-03-18T18:40:22+5:302021-03-18T18:40:40+5:30
देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.
देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.
अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातील विद्यार्थी तासन्तास अभ्यास करत आहेत. एमपीएससी परीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाच वेळा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या वयाबरोबरच मेहनतही वाया जात असल्याने विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले होते. तेव्हा शासनाने २१ मार्च रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली; पण याच तारखेला पूर्व नियोजित रेल्वे परीक्षा घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या चार टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारीमध्ये पार पडला. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा २१ मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक अभ्यासावर भर दिला होता. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील परीक्षा दिली आहे, तर आता एकाच दिवशी एमपीएससी व रेल्वे परीक्षा येत असल्याने कोणती परीक्षा द्यावी आणि कोणती टाळावी हा पेच विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून वर्षभर केलेला अभ्यास तसेच वर्ष वाया जाणार अशी हुरहूर लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले आहे.
केंद्रावर पोहण्यासाठी कसरत
रेल्वेच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र नसल्यामुळे त्यासाठी मुंबई, वाशी, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी ठिकाणी जाऊन परीक्षा द्यावी लागेल. नाशिक आणि मुंबई अशा दोन बाजू असल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचण्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊन तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच आता कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्यामुळे काळजी घेण्याची आव्हान उभे आहे.
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अभ्यासिका आणि वाचनालय बंद असताना देखील विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन जोमाने परीक्षेची तयारी केली. मात्र, ऐनवेळी दोन्ही आणि खासगी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
- रघुनाथ मोरे, परीक्षार्थी.
आज स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी एकाच परीक्षेवर अवलंबून न राहता विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असतो. मात्र, एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे परीक्षेस हजर राहण्यासाठी मोठी तारांबळ होणार आहे.
- संपत दोंदे, परीक्षार्थी.