कोरोनापासून बचावासाठी रेल्वेची सुरक्षाव्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:16 AM2020-07-04T00:16:47+5:302020-07-04T00:49:33+5:30
प्राणघातक कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड, देवळालीसह भुसावळ मंडळात कर्मचाऱ्यांना विविध आधुनिक सोयी-सुविधा दिल्या आहेत.
नाशिकरोड : प्राणघातक कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड, देवळालीसह भुसावळ मंडळात कर्मचाऱ्यांना विविध आधुनिक सोयी-सुविधा दिल्या आहेत.
तिकीट तपासणीसांना फेसशिल्ड व काचेचे भिंग देण्यात आले आहेत, तर रिझर्व्हेशन कार्यालयात टू वे माईक सिस्टिम लावण्यात आली आहे. तसेच नोटांपासून कर्मचाºयांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अल्ट्रा वाइलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीनही देण्यात आली आहे.
सध्या विशेष प्रवासी रेल्वेगाड्या सुरू आहेत. रेल्वे तिकिटाचे आरक्षण खिडकीवर टू वे माइकची सोय रेल्वेने केली आहे. प्रवासी आरक्षणासाठी केंद्रावर येत असतात. ते रांगेत असताना त्यांना तसेच आरक्षण कर्मचाºयांनाही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून संवाद साधावा लागतो. त्यामुळे अडचणी येतात. ते लक्षात घेऊन रेल्वेने सर्व आरक्षण खिडक्यांवर टू वे माईक सिस्टमची सोय केली आहे. या माध्यमातून रेल्वे आरक्षण कर्मचारी प्रवाशांचे बोलणे व्यवस्थित समजून घेऊ शकतात.
आरक्षण खिडक्यांवर बाहेरील बाजूस प्रवाशांचे बोलणे ऐकून घेण्यासाठी स्पिकर लावण्यात आले आहे.
नोटांचा व्यवहार आरक्षण कार्यालयात जास्त प्रमाणात होत असल्यामुळे भुसावळ मंडळातील सर्व आरक्षण कार्यालयांमध्ये सुरक्षेसाठी अल्ट्रा वाइलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन लावण्यात आली आहेत. आरक्षण लिपिक आणि प्रवासी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मशीन लावण्यात आली आहे. नोटांची देवाण- घेवाण करताना याचा चांगला उपयोग होणार आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोळा तिकीट तपासणीस आहेत. त्यांना फेसशिल्डही देण्यात आले आहेत. टिसींना आपले काम करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. गाडीमध्ये बसलेल्या तसेच स्थानकात आलेल्या प्रवाशांचे तिकीट जवळून तपासावे लागते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे रेल्वेने भुसावळ मंडळमधील सर्व तिकीट तपासणीच्या सुरक्षेच्या दृष्टीने फेसशिल्ड आणि भिंग काच दिली आहे.