नाशिकला येणारी रेल्वे वाहतूक पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:11 AM2021-07-24T04:11:35+5:302021-07-24T04:11:35+5:30
कसारा घाटात बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने गुरुवारी दुपारपर्यंत मुंबईला येणारी - जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली ...
कसारा घाटात बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने गुरुवारी दुपारपर्यंत मुंबईला येणारी - जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. त्यातच उंबरमाळी स्थानकात पाणी साचून रेल्वे ट्रॅकखालील खडी वाहून गेल्याने समस्येत भर पडली होती. यामुळे मुंबई-भुसावळदरम्यानची रेल्वेसेवा तब्बल पंधरा तास ठप्प होती. पंचवटी, राज्यराणी, सेवाग्राम, जनशताब्दी, मुंबई-जबलपूर, अमरावती-मुंबई, गोरखपूर, हावडा, शालिमारसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबईहून सुटणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. नाशिकरोड, मनमाड, इगतपुरी स्थानकात प्रवासी अडकले होते. गुरुवारी दुपारनंतर कसारा घाटातून हळू रेल्वेसवा सुरू होती. मध्यरात्रीपर्यंत पूर्ववत रेल्वे सेवा सुरू झाली होती. मुंबईहून सुटणाऱ्या व मुंबईला येणाऱ्या तसेच नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या सर्व रेल्वे शुक्रवारी आपल्या निर्धारित वेळेला धावत असल्याची माहिती स्टेशन मास्तर आर. के. कुठार यांनी दिली. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दुपारी साडेचार वाजता येणारी एर्नाकुलम ते निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेसच्या मार्गात पुणे-दौंड मार्गे मनमाड असा बदल करण्यात आला होता.