रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:29 AM2018-12-29T00:29:41+5:302018-12-29T00:30:10+5:30
भगूर रेल्वे फाटक येथे दोन्ही बाजूने उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे काम रखडून गेल्याने वाहनधारकांची गैरसोय तशीच आहे.
भगूर : भगूर रेल्वे फाटक येथे दोन्ही बाजूने उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे काम रखडून गेल्याने वाहनधारकांची गैरसोय तशीच आहे. भगूर येथून सिन्नर-घोटी रस्त्याकडे जाण्यासाठी मार्ग असल्याने नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तीनही तालुक्यातील वाहनधारक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. नूतन विद्यामंदिर शाळेच्या बाजूला असलेल्या नवीन रेल्वेगेटवर रेल्वे येण्या-जाण्याच्या वेळेस वाहनधारकांना थांबावे लागते. यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती. वाहनधारकांची व ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन भगूर रेल्वे फाटक येथे रेल्वे प्रशासनाकडून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले. ४५० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.
रेल्वे प्रशासनाकडून टाळाटाळ
यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, रेल्वे येण्या-जाण्याच्या वेळेस सर्वांनाच ताटकळत उभे राहावे लागते. उड्डाण पुलाचे दोन्ही बाजूंनी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. फक्त मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रूळावरील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. वाहनधारकांची गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक उपलब्ध करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारक व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.