माल वाहतुकीसाठी रेल्वेची ‘प्रोत्साहन योजना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 09:53 PM2020-04-23T21:53:20+5:302020-04-24T00:17:14+5:30
नाशिकरोड : कोरोनामुळे भारतीय रेल्वेने माल वाहतुकीसाठी अनेक प्रोत्साहन योजना देण्याची घोषणा केली असून, या योजना ३० आगस्टपर्यंत सुरू राहतील.
नाशिकरोड : कोरोनामुळे भारतीय रेल्वेने माल वाहतुकीसाठी अनेक प्रोत्साहन योजना देण्याची घोषणा केली असून, या योजना ३० आगस्टपर्यंत सुरू राहतील. सध्या कोरोनामुळे प्रवासी रेल्वेगाड्या बंद असून गहू, तांदूळसारख्या जीवनावश्यक वस्तू तसेच साहित्य वाहतुकीसाठी मालगाडी सेवा सुरू केली आहे.
रिकामे कंटेनर आणि फ्लॅट वॅगनद्वारे ने-आण करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही सुविधा ३० एप्रिलपर्यंत राहील. त्यासाठी गुड्स शेडमध्ये स्वत: उपस्थित होऊन पावती घेण्याची आवश्यकता नाही. नवीन नियमानुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पावती देण्यात येणार असून, ग्राहकाने इलेक्ट्रॉनिक पावतीचा फायदा घेतला नाही तरी गंतव्य स्थानकावर पावती नसतानाही मालाची डिलेवरी सुधारित नियमानुसार देण्यात येईल. बीसीएनएचएल रॅक ट्रेन लोडचा लाभ घेण्यासाठी पूर्वीच्या ५७ बीसीएनएचएल वॅगन ऐवजी ४२ वॅगनपर्यंत सूट देण्यात येईल. म्हणजे ४२ बीसीएनएचएल वॅगन बुक करता येतील. अत्यावश्यक वस्तूंच्या लोडिंगला समर्थन देण्यासाठी वॅगन आता मिनी रेक, टू पॉइंट रेक इत्यादींशी संबंधित अंतराशी संबंधित अटी उद्योगास प्रोत्साहित करण्यासाठी शिथिल करण्यात आल्या आहेत.