मालवाहतुकीत रेल्वेचा विक्रम; चार कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:15 AM2021-08-01T04:15:02+5:302021-08-01T04:15:02+5:30
नाशिक रोड : येथील रेल्वे मालधक्क्यावरून जुलैच्या एका महिन्यात देशातील विविध राज्यांत रेल्वेच्या २९ एनएमजी रेकद्वारे तब्बल २९०० चारचाकी ...
नाशिक रोड : येथील रेल्वे मालधक्क्यावरून जुलैच्या एका महिन्यात देशातील विविध राज्यांत रेल्वेच्या २९ एनएमजी रेकद्वारे तब्बल २९०० चारचाकी गाड्या पाठवून देशात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्याने विक्रम प्रस्थापित केला आहे. या वाहतुकीतून रेल्वेला तब्बल सव्वाचार कोटी रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे.
भारतीय रेल्वेमध्ये अंदाजे चार ते पाच वर्षांपूर्वी कार, ट्रॅक्टर, जीप अशी छोटी चार चाकी वाहने वाहतुकीसाठी अवघे एलएचबीचे सहा रेक होते. चार ते पाच वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने याकडे व्यावसायिकदृष्ट्या लक्ष देऊन जुने प्रवासी वाहतूक करणारे रेल्वे डब्यांमधील आसन व शौचालय काढून पोकळ रेल्वे डबा बनविला. एनएमजी म्हणजे न्यू मॉडिफाइड गुड्स रेक असून रेल्वेचे जे जुने झालेले डबे भंगारामध्ये देण्याच्या परिस्थितीचे झाले होते. त्यांना रेल्वे प्रशासनाने ॲल्युमिनियम कोचसारखे बनवून छोट्या कार वाहतुकीसाठी त्यांचा वापर केला जात आहे.
चौकट===
रेल्वे मालधक्क्याचा विक्रम
गेल्या तीन वर्षांपासून एनएमजीचे न्यू मॉडिफाइड रेक रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बनविल्याने चारचाकी गाडी बनविणाऱ्या कंपनीने रेल्वेकडे रेकची मागणी केली तर एक-दोन दिवसांत रेक उपलब्ध होऊन जातो. त्यामुळे कार बनविणाऱ्या कंपन्यांनी रेल्वेद्वारे नवीन कार विविध पाठविण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्यावरून दर महिन्याला एनएमजीचे २१ रेक पाठविण्यात आले होते. रेल्वेच्या एका रेकला पंचवीस डबे असून प्रत्येक डब्यात चार कार बसतात. महिंद्रा कंपनीचा हरिद्वार येथे प्लांट असून हरिद्वार रेल्वे मालधक्क्यावरून एनएमजीचे एका महिन्यात देशात सर्वाधिक २३ रेक पाठविण्याचा विक्रम होता. तो जुलै महिन्यात मोडीत निघाला. तब्बल २९ रेक राजस्थान, दिल्ली, आसाम, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश तसेच बिहारपर्यंत गेलेले रेल्वेचे रेकमधील काही गाड्या नेपाळ, बांगलादेशला देखील गेल्या. या रेकमधून २९०० गाड्या पाठविण्याचा विक्रम संपूर्ण देशात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्याने केला आहे. यामधून रेल्वे प्रशासनाला ४ कोटी २५ लाख ४४ हजार ४१२ रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे.
चौकट===
रेल्वे एनएमजीच्या रेकच्या डब्यामध्ये कार ठेवताना त्यांच्या चाकातील थोडी हवा कमी केल्याने नवीन गाडी रेल्वेच्या डब्यात कुठल्याही बाजूला टच होत नाही. तसेच चारही चाकांना पुढून व मागून लाकडाची उटी लावून तसेच गाडी गेअरमध्ये ठेवली जाते. यामुळे नवीन कार सहीसलामत कमी वेळेत व कमी खर्चात पाहिजे त्या ठिकाणी पोहोचत आहे.
प्रतिक्रिया==
रेल्वेने कार वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात नवीन एनएमजी रेक बनविल्याने संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून योग्य समन्वय साधल्याने रेल्वे प्रशासनाला त्यामधून चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न रेल्वेला मिळविता आले. तसेच संबंधित कंपन्यांना देखील कमी खर्चात व कमी वेळेत सुरक्षितरीत्या नवीन गाड्या पाठवणे सहजरीत्या शक्य झाले.
-कुंदन महापात्रा, मुख्य माल पर्यवेक्षक, नाशिक रोड
(फोटो ३१ रेल्वे, महापात्रा)