साठविलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:08+5:302021-06-06T04:11:08+5:30
मागील वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा ...
मागील वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा झाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने खरीप-रब्बी हंगामातील कांदा रोपे खराब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध होईल, तेथून मिळेल त्या भावात कांदा बियाणे आणून कांदा लागवड केली. मात्र, या बियाणांतही शेतकऱ्यांची फसवणूक झाली. लागवड केलेल्या कांद्याला डोंगळे निघाले. तसेच वातावरणातील सततच्या बदलामुळे व महिन्यातून दोन ते तीन वेळेस पडत असलेल्या बेमोसमी पावसाने कांदा पिकावर मावा, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली. असे असले तरी तयार झालेला कांदा बाजार समित्या बंद असल्यामुळे विक्री करता न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी पर्यायी व्यवस्था नव्हती, त्यांनी कांदा शेतातील झाडांच्या सावलीत पोळ लावून झाकून ठेवला. मागील महिन्यात झालेल्या वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली तसेच होत असलेला अवकाळी पाऊस यामुळे कांदा सडून खराब झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला असल्यामुळे अनेकांनी कांदा उकिरड्यावर टाकून दिला आहे तर काहींना अन्न-पाण्याच्या शोधात असणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांना कांदा खाद्य म्हणून खाऊ घालावा लागत आहे.
यावर्षी येवला तालुक्यात सुमारे पंधरा हजार हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केला. बियाणे भेसळयुक्त निघाल्याने व वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे कांदा पिकाला पोषक वातावरण तयार न झाल्याने उत्पादन घटले. तयार झालेला कांदा बाजार समित्या कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असल्याने विकता आला नाही. त्यामुळे कांदा झाकून ठेवावा लागला. .नियमात शिथिलता आल्याने व बाजार समित्या सुरू झाल्याने शेतकरी वर्गाने कांदा विक्रीसाठी काढला; मात्र कांदा खराब होऊन सडून गेल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लाखो रुपये खर्च करूनही पदरात काहीच पडत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून, त्याच्यापुढे खरीप भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट...
कोरोना लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्याने उन्हाळी कांदा विकता आला नाही, त्यामुळे कांदा साठवून ठेवला. आता नियमात बदल होऊन बाजार समित्या सुरू झाल्याने कांदा विक्रीसाठी काढला; मात्र वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने संपूर्ण कांदा सडून नुकसान झाले आहे. शासनाने अशा सर्व खराब झालेल्या कांद्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
- सागर शेळके, कांदा उत्पादक, ठाणगाव