डिसेंबरमध्ये पाऊस, होय हे माझं सरकार....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:33 PM2017-12-05T14:33:48+5:302017-12-05T14:36:12+5:30
ओखी वादळामुळे नाशिक जिल्ह्यातील हवामानावरही परिणाम झाला असून, मंगळवारी सकाळपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने त्याचा धागा
नाशिक : ओखी चक्रीवादळाने सर्वत्र हा:हाकार उडून मानवी आरोग्यास तसेच शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागत असताना अशा परिस्थितीतही नेटीझन्सने सोशल मिडीयाचा आधार घेत, आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची संधी सोडली नाही, अगदी या चक्रीवादळाला सरकार जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यापासून ते एकमेकांची खिल्ली उडवून मनोरंजनाची पर्वणी साधली आहे.
ओखी वादळामुळे नाशिक जिल्ह्यातील हवामानावरही परिणाम झाला असून, मंगळवारी सकाळपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने त्याचा धागा पकडून ‘आम्ही शाळेत असताना ही वादळं कुठ मेलेली काय माहित??’ असा प्रश्न विचारून ‘पुर्वीच्या पिढीपेक्षा आताची पिढी जास्त पावसाळे पाहतेय’ असे नमूद करून अनेक पावसाळे पाहिलेल्यांना एक प्रकारे खिजविण्यात आले आहे. ‘कुणाची पावसाळी पिकनिक राहिली असेल तर उरकून घ्या पटकन...तो परत आलाय’ असे नमूद करतांनाच, कवींची खिल्ली उडवितांना, ‘कुणाच्या पावसाच्या कविता टाकायच्या राहिल्या असतील तर टाकून घ्या पटकन...तो आलाय परत’ असे म्हटले आहे. पावसाला उद्देशून ‘ प्रिय पाऊस, परत एकदा वांदे नको करूस... काय ते एकदाच सांग.. स्वेटर घालू की रेनकोट?’ खवय्यांना पर्वणी म्हणून ‘खेडके पण कन्फूज आहेत, परत जून महिना आला की काय’ अशी कोटी करण्यात आली आहे. सोशल माध्यम म्हटले तर पुण्याची आठवण येत नाही असे होतच नाही, ओखीच्या निमित्ताने ‘आमच्याकडे स्वेटरला प्लॉस्टिक लाऊन मिळेल- लेले होजिअरी, सदाशिव पेठ पुणे’ असे नमूद करून पुणेकरांची खोड काढण्यात आली आहे.
वादळाच्या निमित्ताने सरकारवर टिका करण्याची संधीही राजकारण्यांनी सोडली नाही, ‘च्या मायला पुन्हा पावसाळा आला, आता दिवाळी येणार..परत बोनस, होय हे माझं सरकार, आम्ही लाभार्थी !’ याच बरोबरच ‘याच्या अगोदर मला डिसेंबरमधी कधीच पाऊस बघायला नाय भेटला... पण या वर्षी डिसेंबरमधी पाऊस बघायला भेटला...होय हे माझ सरकार...मी लाभार्थी ! यावर सत्ताधारी पक्षाने देखील संधी सोडली नाही, ‘आज फिर आके बारिस ने किचड कर दिया, लगता है ‘कमल’ खिलने का इशारा कर दिया’ असे सांगून विरोधकांना मुंहतोड उत्तर दिले आहे.