आद्रा नक्षत्रात देखील पावसाची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 07:27 PM2019-07-01T19:27:57+5:302019-07-01T19:28:59+5:30
देवळा : मृग नक्षत्रानंतर सुरू झालेले आद्रा संपत आले. परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे खरीप पीकांचे नियोजन कोलमडले असून गतवर्षी दुष्काळाने पोळलेला शेतकरीवर्ग मोठ्या आशेने जोरदार पावसाची प्रतिक्षा करीत आहे.
देवळा : मृग नक्षत्रानंतर सुरू झालेले आद्रा संपत आले. परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे खरीप पीकांचे नियोजन कोलमडले असून गतवर्षी दुष्काळाने पोळलेला शेतकरीवर्ग मोठ्या आशेने जोरदार पावसाची प्रतिक्षा करीत आहे.
तालुक्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे. देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पूर्व मशागतीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले आहेत. तालुक्यात रिमझीम पावसाने काही भागात थोडीफार हजेरी लावली आहे.
८ जूनला सुरू झाले मृग नक्षत्र २१ जुलैला संपले. या कालावधीत देवळा तालुक्याला पावसाने हुलकावणी दिली. २२ जून पासून सुरू होणाऱ्या आद्रा नक्षत्रात तरी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगुन होते. परंतु आद्रा संपत आले तरी अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांची पेरणी लांबणीवर पडली आहे. परिणामी शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे.
संपूर्ण तालुक्यात खरीप पूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली असून पावसाळा सुरू होऊन तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाला उशीर झाल्यास मका, बाजरी, मूग, सोयाबीन, तूर आदी खरीप पीकांच्या लागवडीला उशीर होतो. यामुळे रब्बी हंगामातील पीकांच्या लागवडीला देखील उशीर होतो. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा आदी पीकांना अंतिम टप्प्यात पाणी देतांना पाणीटंचाई निर्माण होऊन पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पीके सोडून द्यावी लागतात व शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते.
चालू खरीप हंगामासाठी देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्र तयार असून त्यात तृणधान्य २५७५०, कडधान्य १८२०, गळीत धान्य १४४०, खरीपाचा कांदा ४५००, भाजीपाला ७५० व इतर पिके ३०० असे एकूण ३५१०० हेक्टर क्षेत्र खिरपाचे तयार आहे त्यात सर्वसाधारणपणे ३२९०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होऊ शकते. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो.
तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने शेतकºयांनी खरिपाच्या भांडवलासाठी साठवून ठेवलेले धान्य बाजारात अद्यापही आणलेले नाही. गहू, बाजरीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत धान्याचे भाव कडाडले आहेत. त्याचबरोबर भाजीपाला ही उच्चांकी किंमतीत विकला जात असल्यामुळे सर्वसामान्य माणसाची परवड होत आहे. पर्यायाने पावसाच्या ओढीचा शेतकºयांबरोबरच व्यापारी व सर्व सामान्य जनतेवर परिणाम दिसून येत आहे.