पावसामुळे प्रचारात व्यत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 02:14 AM2019-10-20T02:14:12+5:302019-10-20T02:15:47+5:30
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलींना शनिवारी दुपारी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. अचानक आलेल्या पावसामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलींना शनिवारी दुपारी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. अचानक आलेल्या पावसामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली तर अनेकांनी सुरक्षित आसरा घेतला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे अखेर प्रचार रॅली स्थगित करून मतदारांशी व्यक्तिगत भेटीगाठी व भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची पायपीट शनिवारी सायंकाळी ५ वाजता थांबली. तत्पूर्वी उमेदवारी दाखल केल्यानंतर मतदार संघ पिंजून काढण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी सर्वच राज्यस्तरीय नेत्यांनी नाशिक शहर व जिल्ह्यात हजेरी लावून जाहीरसभा घेतल्या. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरण ढवळून निघाले होते.
शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार असल्याचे पाहून आदल्या दिवसांपासूनच उमेदवारांनी शनिवारी सकाळी शक्तिप्रदर्शन करीत प्रचार रॅली काढण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार काही उमेदवारांनी सकाळी १० वाजता आपापल्या संपर्क कार्यालयापासून प्रचार रॅली काढली. काही उमेदवारांनी ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन केले तर काहींनी ध्वनिक्षेपकाचा वापर केला. प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली जात असतानाच, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही वेळातच पावसाने जोर धरल्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने प्रचार दुपारनंतर संपुष्टात आणावा लागला.
१९५० हेल्पलाइन नंबर
निवडणुकीसंदर्भात कोणतीही माहिती आणि गैरसोय विषयी जाणून घेण्यासाठी मतदारांना १९५० हा हेल्पलाइन नंबर देण्यात आलेला आहे. या सुविधेचा लाभ १२ हजारांपेक्षा अधिक मतदारांनी घेतलेला आहे. आलेल्या सर्व कॉल्सचे निराकरण करण्यात आलेले असून, कोणतीही तक्रार पडून नाही, असा दावा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी केला आहे.
तक्रारीसाठी सीव्हीजल अॅप
उमेदवार तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी सी-व्हीजील अॅप असून, त्या अंतर्गत आत्तापर्यंत नऊ तक्रारी आलेल्या असून, या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारांना या अॅपवर तक्रारीची माहिती नोंदवू शकणार आहेत. मोबाइलवर अॅप डाउन लोड करून त्यावर पुराव्यासाठी छायाचित्रदेखील टाकले जाऊ शकते.