जिल्ह्यात पाऊस; वीज पडून दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:11 AM2018-06-21T01:11:20+5:302018-06-21T01:11:20+5:30
नाशिक : पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांवर वरुणराजाची कृपादृष्टी बुधवारी (दि. २०) दुपारी झाली. अवघ्या दीड तासात २६ मि.मी. इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान केंद्राने केली आहे. जिल्ह्यातही विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यात वीज पडून सिन्नर तालुक्यातील मिठसागरे तसेच हिवरगाव येथे प्रत्येकी एक युवक ठार झाला आहे. तसेच दोन गायीही मरण पावल्या आहेत.
मिठसागरे येथे वीज पडून ३० वर्षीय युवक ठार झाला तर देवपूर येथे झाडाखाली बांधलेल्या गायींवर वीज पडून दोन गायी ठार झाल्याची घटना घडली. वरुणराजा जणू नाशिककरांवर रुसला की काय अशी शंका घेतली जात होती; कारण ७ जूनच्या मध्यरात्री झालेल्या पावसानंतर मात्र पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजासह सर्वच धास्तावले होते. शहरासह जिल्ह्णात पाऊस लांबल्याने चिंता व्यक्त केली जात होती. बुधवारी दुपारी दीड तास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दिलासा जरी मिळाला असला तरी सलगपणे पाऊस व्हावा, अशीच अपेक्षा नागरिक करीत आहेत. दरम्यान मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मिठसागरे येथे वीज पडून प्रवीण गणपत कासार (३०) या युवकाचा मृत्यू झाला. देवपूर शिवारात देवपूर-मिठसागरे रस्त्यावर डांबरनाला परिसरात रणजीत दशरथ गडाख यांच्या वस्तीवरही वीज पडली. गडाख यांनी त्यांच्या गायी झाडाखाली बांधलेल्या दोन गायी ठार झाल्या.
उत्तर महाराष्टÑासह जिल्ह्णात मान्सूनच्या प्रवेशाला विलंब झाला. मान्सूनचे ढग अरबी समुद्रापासून पुढे सरकण्यास पोषक असे वातावरण तयार झालेले नसल्यामुळे पावसाची प्रतीक्षा करावी लागत होती. वाऱ्याचा वेगही शहरात प्रचंड प्रमाणात वाढल्याचा अनुभव आठवडाभरापूर्वी नाशिककरांना आला. वेगाने वाहणाºया वाºयामुळे पाऊस अधिक लांबण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. बुधवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. तत्पूर्वी पावणेतीन वाजेपासून थंड वारा सुटला होता आणि शहरावर ढग दाटून आले होते. दुपारी सुरू झालेला पाऊस साधारणत: साडेचार वाजेपर्यंत शहरात कायम होता. साडेचार वाजेनंतर पावसाचा जोर कमी झाला. या दीड तासात २६ मि.मी. इतका पाऊस शहरात पडला. हंगामातील हा पावसाचा उच्चांक राहिला असून, आतापर्यंत ६९ मि.मी. इतका पाऊस शहरात या वीस दिवसांमध्ये झाला आहे.
१७ झाडे कोसळली
दीड तास झालेला जोरदार पाऊस आणि सुटलेला सोसाट्याच्या वाºयामुळे शहर व उपनगरांमध्ये एकूण १७ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची नोंद अग्निशामक मुख्यालयाने केली आहे. दुपारी साडेतीन वाजेपासून अग्निशामक मुख्यालयाचे दूरध्वनी खणखणू लागले. शहरातील शरणपूररोड, कॉलेजरोड, गंगापूररोड, टाकळीरोड, पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर आदी भागांमधून झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्याने नागरिकांकडून मदत मागण्यात आली. मुख्यालयाच्या दोन बंबांसह पंचवटी, नाशिकरोड, सिडको या उपकेंद्रांचे बंबही रस्त्यावर धावत होते. जवानांनी भर पावसात ठिकठिकाणी पडलेली झाडे हटवून मार्ग मोकळा केला. या हंगामात आतापर्यंत ३५ झाडे कोसळली आहेत.