जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

By admin | Published: September 9, 2015 11:19 PM2015-09-09T23:19:57+5:302015-09-09T23:20:45+5:30

जनजीवन विस्कळीत : शेतकऱ्यांना दिलासा, खरीप पिकाला जीवदान

Rain fall in the district for the second consecutive day | जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

Next

नाशिक : जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, दोन दिवसांपासून अनेक गावात परतीच्या पावसाने हजेरी लावली.
सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कॅम्पसह मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. बुधवारी शहरात तुरळक पाऊस पडला असला तरी तालुक्यातील दाभाडी, चंदनपुरी, येसगाव, मथुरपाडे परिसरात जोरदार पाऊस पडल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले
आहे. मंगळवारी परिसरातील विविध पर्जन्यमापकात मालेगावी २८ मीमी, करंजगव्हाणला ३, झोडग्याला १३, दाभाडीत ४, सायने २, कळवाडी ४ तर निमगावी ७ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळपासून आकाशात पावसाचे ढग गोळा झाल्याने दिवसभरात क्वचितच सूर्याचे दर्शन झाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्दोन दिवसापासून पाऊस पडत असल्याने चिंतेचे वातावरण कमी होण्यास मदत झाली आहे. आगामी काळात असाच पाऊस पडल्यास पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
अभोण्यात पाऊस : शेतकऱ्यांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविणाऱ्या पावसाने बुधवारी परिसरात हजेरी लावली. काही दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत होते, परंतु पावसाने हजेरी लावली नाही. बुधवारी सकाळपासूनच वातावरणात उष्णता होती. मोठ्या विश्रातीनंतर पावसाचे आगमन झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.


त्र्यंबकेश्वर : शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसाचे वातावरण तयार झाले, मात्र जोरदार पाऊस झालाच नाही. मागील वर्षी ९ सप्टेंबरपर्यंत १७७८ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी ९ सप्टेंबरपर्यंत केवळ ८४३ मिमी पाऊस पडला आहे.
घोटी : अनेक महिनांपासून पावसाच्या माहेरघरातूनही बेपत्ता झालेल्या पावसाने बुधवारी जोरदार पुनरागमन केले. दुपारच्या सुमारास तालुक्यातील पूर्व भागासह महामार्गालगतच्या गावांना पावसाने झोडपून काढले. दरम्यान, या पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांना संजीवनी मिळाली असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातही पावसाने महिनाभरापासून पाठ फिरविली होती. पावसाळ्याचा ऋतु असतानाही महिनाभरापासून रखरखित उष्मा जाणवत होता. उन्हाळ्याची अनुभूती येत होती. याचा परिणाम भात, नागली, वरई आदि पिकांवर झाला होता. ही पिके पाण्याअभावी संकटात आली होती. दरम्यान, तालुक्यातील धरणसाठ्यात वाढ होऊनही पाण्याचा विसर्ग होत राहिल्याने धरणानी तळ गाठला होता.पावसाने दगा दिल्यामुळे खरीप पिके संकटात आलेली असताना बुधवारी दुपारपासून मेघगर्जनेसह तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाल्याने तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसाने घोटी व इगतपुरी शहरातील सखल भागात पाणी साचले, तर जनजीवनही विस्कळीत झाले. (लोकमत चमू)

पावसासाठी सिन्नरला रुद्राभिषेक व होमहवन

सिन्नर : येथील गणेश पेठेतील सिद्धेश्वर मंदिरात आर्य-चाणक्य युवा फाउण्डेशनच्या वतीने पावसासाठी रुद्राभिषेक व होमहवन करण्यात आले. संपूर्ण भारतात वरुणराजाने भरपूर बरसावे, असे साकडे यावेळी घालण्यात आले. पावसाच्या पाण्यावरच मोठ्या प्रमाणात शेती अवलंबून असून, त्याच्या भरवशावरच अनेक पिके घेतली जातात. मात्र, यंदा पावसानेच पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना नैराश्य आल्याचे चित्र आहे. वेळेवर आणि भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी वरुणराजाला साकडे घालून यज्ञ करण्याचे वेदशास्त्रात सुचवण्यात आले आहे. त्यानुसार आर्य-चाणक्य युवा फाउण्डेशनच्या सोनल लहामगे, उमेश काकड, सौरभ ठाणेकर, विशाल चव्हाण, महेश निकम, विकी शेळके, संतोष शिंदे, तुषार गाडेकर यांनी पुरोहित दुर्गेश मालपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पावसासाठी रुद्राभिषेक व होमहवन केले. त्यानंतर सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आर्य-चाणक्य युवा फाउण्डेशनच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निसर्गाचा समतोल बिघडत असल्याने पावसाचे प्रमाण घटले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन फाउण्डेशनच्या वतीने करण्यात आले.


 

Web Title: Rain fall in the district for the second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.