पावसाने २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:58 AM2017-10-25T00:58:16+5:302017-10-25T00:58:24+5:30

 Rain has disrupted crops on 25 thousand hectares | पावसाने २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित

पावसाने २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित

Next

नाशिक : आॅक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरहून अधिक शेतपिकांचे नुकसान केले असून, पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकºयांची संख्या जवळपास ५० हजारांच्या आसपास आहे. या संदर्भात कृषिखात्याने अलीकडेच केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब निदर्शनास आली असून, प्रत्यक्ष पंचनाम्यात नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने लावलेली हजेरी तब्बल चार महिने कायम होती. जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या
तुलनेत यंदा १२५ टक्के पाऊस  झाला आहे. सप्टेंबर महिन्यांपर्यंत खरीप हंगामासाठी या पावसाची शेतकºयांना गरज असल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला असला तरी, पावसाचा जोर आॅक्टोबर महिन्यात कायम राहिला. वादळी वारा, विजेचा कडकडाट व तुफान कोसळलेल्या या पावसाने शेती पिकांची अक्षरश: धुळधाण उडविली. त्यात भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या जिरायती क्षेत्रातील पिकांची, तर बागायती क्षेत्रातील द्राक्ष, कांदा, ऊस व भाजीपाला ही पिके नष्ट झाली. द्राक्षबागांच्या ऐन छाटणीच्या व झाडाने फुल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली, तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला.अवकाळी पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी, शासनाकडून नुकसानभरपाई वा पंचनामे करण्याची सूचना नसली तरी, शेतकºयांचा त्यासाठी येणारा दबाव पाहता कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यात जिल्ह्णातील ६६२ गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, त्याचा फटका ४८,१८४ शेतकºयांना बसला आहे. कृषी खात्याने केलेल्या पाहणीत जिल्ह्णातील १२,८८८ हेक्टर क्षेत्रावरील भात, नागली, बाजारी, भुईमूग, सोयाबीन व मका या जिरायती क्षेत्रातील शेती पिकांचे, तर १०,२७४ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, भाजीपाला या बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे विस्तृत पंचनामे अद्याप बाकी असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे झाले शेती पिकांचे नुकसान
भात-३११८ (हेक्टर), नागली-३१८ (हेक्टर), वरई-१६३ (हेक्टर), भुईमूग- १०८ (हेक्टर), उडीद- ९६ (हेक्टर), खुरसणी- १६० (हेक्टर), सोयाबीन- ५८०० (हेक्टर), मका-३०३८ (हेक्टर), कांदा-८६(हेक्टर), भाजीपाला-२३१३ (हेक्टर), द्राक्ष-१०२७ (हेक्टर), बागायत फळपिके-२६३१ (हेक्टर) क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत.

Web Title:  Rain has disrupted crops on 25 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.