गोदामाई ओसंडून वाहिली, हंगामातील पहिला पूर; गंगापूरमधून १० हजार क्युसेकचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 02:36 PM2022-07-11T14:36:47+5:302022-07-11T14:37:22+5:30
दुपारनंतर नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते. या हंगामात गोदावरीला पहिला पूर आला.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी (दि.११) दिवसभर मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस शहर परिसरात सुरुच होता. यामुळे गोदावरीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून नदीत आलेले पावसाचे पाणी आणि गंगापूर धरणातील पाण्याचा दुपारी १ वाजेपर्यंत तीन टप्प्यांत विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदामाई ओसंडून वाहू लागली आहे.
दुपारनंतर नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते. या हंगामात गोदावरीला पहिला पूर आला. नदीकाठच्या नागरिकांसह, रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन व अग्नशिमन दलाकडून अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात ५० मिमी पाऊस पडला होता. त्या तुलनेत शनिवारी पाऊस कमी राहिला; मात्र रविवारी पुन्हा पावसाने जोर धरला. रविवारी दिवसभरात शहरामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला; मात्र रात्री आठ वाजेपासून पुढे सोमवारी पहाटेपर्यंत मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले. यामुळे गोदावरीच्या अन्य उपनद्यांचीही पाण्याची पातळी सकाळी वाढलेली दिसली.
नंदीनी, वरुणा या नद्यांचाही जलस्तर वाढला आहे. गोदावरीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक नदीपात्रात झाली. तसेच या हंगामातील पहिला विसर्ग गंगापूर धरणातून सकाळी ११ वाजेच्या सुमारास करण्यात आला. नदीपात्रात दीड हजार क्युसेस पाणी झेपावले. यानंतर दर तासाला विसर्गात वाढ करण्यात आली.
गंगापुरच्या पाणलोट क्षेत्रात मध्यरात्रीपासून जोरदापर पाऊस सुरु असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात तीन टप्प्यांत करण्यात आला. दुपारी १२ वाजता तीन हजार तर एक वाजता थेट साडे पाच हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला होता. यामुळे गोदावरीत रामकुंडापासून पुढे साडे सात हजार क्युसेक एवढे पाणी नदीपात्रात प्रवाहित झालेले होते. दुपारी २ वाजता पुन्हा साडे पाच हजाराने विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे गंगापूर धरणातून १० हजार क्युसेक इतका मोठा विसर्ग गोदावरीच्या पात्रात करण्यात आल्याने गोदावरी दुथडी भरून वाहिली. पूर बघण्यासाठी शहरातील अहल्यादेवी होळकर पुलावर नाशिककरांनी गर्दी केली होती.
गंगापूरमधून झालेला विसर्ग (क्युसेकमध्ये) -
सकाळी ११ वा. - १,५००
दुपारी १२ वा. - ३,०००
दु. १:०० वा. - ५,५००
दु२.०० वा. - १०,०००