प्रभाग रचनेत नियम धाब्यावर, तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:55 AM2022-02-10T00:55:30+5:302022-02-10T00:56:16+5:30
महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आता खऱ्या अर्थाने तक्रारींचा पाऊस सुरू झाला असून जवळपास चाळीसहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह अन्य अनेकांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून प्रभाग रचना केल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत.
नाशिक- महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आता खऱ्या अर्थाने तक्रारींचा पाऊस सुरू झाला असून जवळपास चाळीसहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह अन्य अनेकांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून प्रभाग रचना केल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी १ फेब्रुवारीस प्रभाग रचना घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर १४ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत देण्यात आली आहेत. पहिल्या दोन दिवसात सात हरकती प्राप्त झाल्या होत्या. मात्र मंगळवारी एकाच दिवशी २४ हरकती आल्या आहेत त्यानंतर बुधवारी (दि.९) सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नगरसेवक पूनम सोनवणे, चंद्रकांत खाडे तसेच स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांचाही हरकत घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे. कालिकानगर, सहवास नगर, मिलिंद नगर, राहुल नगर, तिडके कॉलनी, क्रांती नगर, संभाजी चौक येथील प्रभाग १७ मधील भाग तोडून प्रभाग १६ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे यात जुना आणि नवीन महामार्ग ओलांडला असल्याची हरकत शिवाजी गांगुर्डे यांनी केली आहे.
माजी नगरसेवक संजय चव्हाण यांनी मनपा प्रभाग क्रमांक १९ आणि २० यातील सीमा रेषा स्पष्ट करण्याची सूचना केली आहे. याशिवाय शरद देवरे, अशोक तांबे, तुषार तांबे यांच्यासह अन्य अनेकांनी हरकती घेतल्या आहेत.