पावसाची उघडीप
By admin | Published: August 4, 2016 01:27 AM2016-08-04T01:27:14+5:302016-08-04T01:27:55+5:30
अल्प सूर्यदर्शन : आवरासावरीला वेग; रिमझिम सुरूचं
नाशिक : शनिवारी मध्यरात्रीपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळपासून काहीशी उघडीप दिली असून, उजेड-अंधाराचा खेळ खेळणाऱ्या सूर्यानेही अल्प दर्शन देऊन दिलासा दिला आहे. परिणामी धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण आल्याने गोदावरीच्या पुराची पातळी काहीशी कमी झाली आहे, तर नासर्डी, वाघाडीचाही पूर निवळल्याने मंगळवारी पुराचे पाणी शिरून जनजीवन ठप्प झालेल्या शहरवासीयांनी दिवसभर आवरासावर केली.
मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकट्या नाशिक शहरात १६३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात १२९७ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी अद्यापही कायम असली तरी नाशिक शहर व परिसरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. बुधवारी सकाळी अगदीच अल्प हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी अकरा वाजता लख्ख सूर्यप्रकाश पडला, त्यामुळे नागरिकांना हायसे वाटले. चार दिवसांनी सूर्यदर्शन झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली, परंतु काही वेळानंतर पुन्हा आकाशात काळ्या नभांनी गर्दी केली व दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली.