झाडे तोडण्यासाठी ‘पत्रांचा पाऊस’
By admin | Published: November 4, 2015 10:29 PM2015-11-04T22:29:54+5:302015-11-04T22:31:22+5:30
न्यायमूर्तींना पाठविली पाच हजार पत्रे : वृक्षप्रेमींच्या घरासमोरही धरणे आंदोलन
नाशिक : शहरातील गंगापूररोडसह अन्य ठिकाणी रस्ता रुंदीकरणात बाधीत आणि अपघाताला कारणीभूत ठरलेली झाडे तोडावीत, यासाठी गंगापूररोड रस्ता कृती समितीच्या वतीने सुमारे पाच हजार पत्रे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पाठवून अभिनव आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे आंदोलनाची व्याप्ती वाढवून आता वृक्षप्रेमींच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गंगापूररोडसह अनेक भागात रस्ता रुंदीकरणातील काही प्रजातींची झाडे तोडण्यास मनाई केल्याने सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ता रुंदीकरण पूर्ण होत नाही त्यातच झाडांमुळे अपघात होत असल्याने अशी अडथळा ठरणारी झाडे तोडावी, यासाठी गंगापूररोड कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुख्य न्यायमूर्तींना म्हणणे पटवून देण्यासाठी पाच हजार पोस्टकार्ड पाठविण्याचे समितीने ठरविले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी मुख्य टपाल कार्यालयात टपाल पाठवा आंदोलन करण्यात आले. कृती समितीच्या वतीने नगरसेसवक विक्रांत मते आणि के. जी. मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यात गंगापूररोड भागातील नागरिक, तसेच मोतीवाला कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
सकाळी टपाल कार्यालयातून पत्र पाठविण्याच्या वेळी सचिन मोरे, सुचित्रा मोरे, सुमंत खांदवे, शशिकांत टर्ले, प्रदीप बराने, विश्वास भानोसे, गौरव घोलप, बापू मानकर, अंबादास तांबे, दीपक कटपाल, कैलास कडलग, मिलिंद कदम, प्रताप देशमुख, अजिंक्य घुले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)