पावसाची विश्रांती; विसर्गात कपात
By Admin | Published: August 5, 2016 01:51 AM2016-08-05T01:51:45+5:302016-08-05T01:51:57+5:30
दिलासा : चोवीस तासांत ४७५ मि.मी. पाऊस
नाशिक : सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी तुरळक हजेरी लावून विश्रांती घेतल्यामुळे आकाश निरभ्र होऊन नाशिककरांना सूर्यदर्शनाने मोठा दिलासा मिळाला, तर दुसरीकडे धरणाच्या पाण्याच्या विसर्गातही कपात करण्यात आल्यामुळे गोदावरीचा पूर ओसरण्यास मदत झाली.
गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत नाशिक शहरात ५३ मिलिमीटर इतकाच पाऊस नोंदविला गेला, तर दिवसभर पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेत, सूर्यदर्शन दिल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या चार दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने सर्वत्र कोंदट वातावरण निर्माण झाले होते. पाऊस थांबल्यामुळे पुरामुळे नुकसान झालेल्या तसेच घरे, दुकानांमध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांना आवरासावर करण्यास मोठी मदत झाली.
पूरपरिस्थितीमुळे दोन दिवस सुट्या मिळालेल्या शाळा, महाविद्यालये गुरुवारी पूर्ववत सुरू झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाने चांगलीच उघडीप दिली. चोवीस तासांत ४७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नदी, नाल्यांना आलेला पूरही ओसरला. पावसाने विश्रांती घेताच गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला. (प्रतिनिधी)