पावसाची विश्रांती; धरणातून विसर्ग रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:42 AM2018-07-19T01:42:34+5:302018-07-19T01:42:46+5:30
नाशिक : शनिवारपासून संततधार लावलेल्या पावसाने बुधवारी दिवसभर पूर्ण विश्रांती घेतल्याने सूर्यदर्शन होण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर आले असून, धरणक्षेत्रातही पाऊस थांबल्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने दिवसभरात कमी करण्यात आला व रात्री उशिरा पूर्ण विसर्ग रोखण्यात आल्याने नद्यांचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गोदावरीत पोहण्यासाठी उडी घेतलेला तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, पेठ तालुक्यातील भुवन घाटात दरड कोसळून काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक जिल्ह्णात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणांच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नाशिकसह पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यात विक्रमी पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्णातील धरणांमध्ये ४२ टक्के जलसाठा झाला असून, नाशिकला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर, दारणा धरणातही ७९ टक्के साठा झाल्याने सोमवारपासून धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. गेल्या दोन दिवसात हजारो क्युसेक पाणी गोदावरी व दारणा नदीतून नांदूरमध्यमेश्वरमार्गे जायकवाडीकडे सोडण्यात आले. मंगळवारी रात्रीपासून पावसाने उघडीप दिली, त्याचबरोबर धरणक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गंगापूर धरणातील विसर्ग ९३०२ वरून २४९६ क्युसेक करण्यात आला, तर दारणाचाही साठा १०६०० वरून ११०० क्युसेक करण्यात आल्यामुळे पुराचे पाणी ओसरण्यास मदत झाली आहे. बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेत अधूनमधून सूर्यदर्शन दिल्याने गेल्या पाच दिवसांपासून पावसामुळे वैतागलेल्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्णात ३७६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पावसाची नोंद पेठ तालुक्यात ९८ व त्या खालोखाल इगतपुरी ८८ व सुरगाणा तालुक्यात ७१ मिलीमीटर अशी झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथे ४९ मिलीमीटर व नाशिकला २८ मिलीमीटर नोंद करण्यात आली. जिल्ह्णातील अन्य तालुक्यांत मात्र पावसाची वक्रदृष्टी कायम आहे.