पाऊस परतला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:31 AM2017-09-15T01:31:36+5:302017-09-15T01:32:11+5:30
प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हय़ात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. वादळ वारा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. अकोला शहरातही बर्यापैकी पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना हायसे वाटले; पण पिण्याच्या पाण्यासाठी धो-धो पावसाची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हय़ात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. वादळ वारा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. अकोला शहरातही बर्यापैकी पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना हायसे वाटले; पण पिण्याच्या पाण्यासाठी धो-धो पावसाची गरज आहे.
दुपारपर्यंतच्या तापमानानंतर ३ वाजता अचानक ढग दाटून आले. ढग पावसात परावर्तित होऊन पावसाला सुरुवात झाली. वादळ, विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने शहरातील लघू उद्योजक, नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. विजांच्या कडकडामुळे नागरिकांनी बाहेर पडणे टाळले, रस्त्यावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळ गाठले. त्यामुळे काही मिनिटांतच रस्ते निर्मनुष्य झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मात्र संजीवनी मिळाली आहे. उष्ण तापमान, ढगाळ वातावरण हलका पाऊस या विषम वातावरणामुळे पिकांवर विविध किडींनी आक्रमण केले आहे. हा पाऊस पिकांवरील कीड गळून पडेल, असे तज्ज्ञांचे मत आहे; परंतु त्यासाठी आणखी दमदार पाऊस हवा आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप मात्र सुरू होती.
दरम्यान, मराठवाड्यातून १ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाला सुरुवात होत असते, त्यामुळे परतीच्या पावसाला आता १५ दिवस उरले आहेत. जाता जाता पावसाचे पुनरागमन होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. आता फक्त धरणाच्या पानलोट क्षेत्रात पावसाची गरज आहे.