पंचवटीत वादळी वाऱ्यासह पावसाची सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 11:07 PM2021-05-30T23:07:11+5:302021-05-31T00:56:18+5:30
पंचवटी : परिसरात रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार सलामी दिली. येथील दिंडोरी रोडवरील श्रीरामनगरात रस्त्याच्या कडेला असलेले गुलमोहराचे मोठे झाड उन्मळून पडल्याने उद्यानाच्या भिंतीजवळ उभ्या असलेल्या काही मोटारींचे नुकसान झाले.
पंचवटी : परिसरात रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार सलामी दिली. येथील दिंडोरी रोडवरील श्रीरामनगरात रस्त्याच्या कडेला असलेले गुलमोहराचे मोठे झाड उन्मळून पडल्याने उद्यानाच्या भिंतीजवळ उभ्या असलेल्या काही मोटारींचे नुकसान झाले.
दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी सिनेमाच्या पाठीमागे श्रीरामनगर ही लोकवस्ती आहे. येथील एका उद्यानालगत सुमारे आठ ते दहा वर्षे जुने गुलमोहराचे मोठे झाड पाऊस व वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाडाची फांदी सॅन्ट्रो कारवर (एमएच ०४ डीजे ३७९४) पडल्याने गाडीच्या काचा फुटून मागचा भाग चेपला गेला. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या कटरने कापून कोसळलेल्या झाडाचा अडथळा दूर केला. वृक्ष रस्त्यावर पडल्याने काहीकाळ मुख्य कॉलनी रस्त्यावरची वाहतूक बंद झाली होती.
पावसामुळे परिसरातील रस्ते ओलेचिंब झाले होते, तर रस्त्यावर पाणी साचल्याने काहीकाळ रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सायंकाळी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी किरकोळ कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना झाडाच्या तसेच इमारतीचा आश्रय घ्यावा लागला.. सुमारे अर्धा तास धुवाधार पावसाने पंचवटी परिसराला झोडपले.
फोटो आर वर ३०पंचवटी व ३०कार नावाने