मालेगावसह परिसरात संततधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:18 PM2019-08-04T23:18:38+5:302019-08-04T23:19:08+5:30

मालेगाव : शहरासह तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असून नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Rain showers in the area including Malegaon | मालेगावसह परिसरात संततधार पाऊस

मालेगावी गेला तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने मोसम नदीला आलेला पूर.

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासन दक्ष : नदीकाठावरील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

मालेगाव : शहरासह तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असून नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
जुना मुंबई-आग्रा रोडवर जाफनगर भाग जलमय झाला आहे. सोयगाव परिसरात ठिकठिकाणी घरात पाणी शिरले आहे,. पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
प्रशासनातर्फे दक्षतेचे आवाहन
हरणबारी धरणातून मोसम नदीत विसर्ग सुरू असल्याने रविवारी सायंकाळी पाणी मालेगावात पोहोचले. पुनंद व चणकापूरमधून सुमारे २० हजार क्यूसेक पाणी सोडले आहे. नदीकाठच्या अतिक्रमित झोपडपट्टीधारकांना महापालिकेतर्फे दवंडीद्वारे सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सकाळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाने तालुक्याचा दौरा करून पूरपाणी परिस्थितीची पाहणी करीत नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले. त्यात गिरणा पूल, रोकडो मंदिर, वडनेर, अजंग-वडेल, द्याने, वैतागवाडी पूल, नवकिरण सायझिंगजवळील पुल, अल्लमा एकबाल पूल भागाची पाहणी केली. अल्लमा एकबाल पुलाजवळील झोपडपट्टीधारकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन केले.
गिरणा धरणात १४.६८ जलसाठा
मालेगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात चणकापूर, पुनंद व हरणबारी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जलद गतीने पाण्याचा साठा होत आहे. त्यामुळे गिरणा धरणात आजपावेतो ५७१५.७० टक्के जलसाठा झाला आहे. धरणात एकूण १४.६८ टक्के जलसाठा झाला आहे.
चणकापूर मोठा प्रकल्पमधून १२ हजार क्यूसेक, पुनंद मध्य प्रकल्पातून ५ हजार क्यूसेक, तर इतर नदी, नाले मिळून गिरणा नदीत सुमारे २० हजार क्यूसेकपेक्षा जास्त पूरपाण्यात वाढ होत आहे. जलसंधारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार हरणबारी धरणातून ६ हजार ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
संततधार पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हरणबारी मध्य प्रकल्पाच्या पूरपातळीत वाढ होऊन गिरणा व मोसम नदीकाठावरील नागरीवस्तीत पाणी शिरुन धोका निर्माण होऊ शकतो यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोसम नदीच्या पाणीपातळीत रात्रीतून वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यापासून दूर रहावे, नदीकाठी व नदीवरील पुलांवर गर्दी करु नये, पुराच्या पाण्यात पोहण्याचा धोका पत्कारु नये, किंवा सेल्फी घेण्याचा मोह करू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले आहे.
दरम्यान पुलामुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मनपाच्या अग्निशमन दलाच्या विभागाचा दूरध्वनी क्रमांक ०२५५४-२३४५६७ या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख संजय पवार यांनी केले आहे. सायंकाळी उघडीप सकाळपासून पावसाने रस्ते ओस पडले होते. सायंकाळी चार वाजेनंतर पावसाने उघडीप दिल्याने घरात अडकलेले नागरिक घराबाहेर पडू लागले होते. मोसमला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाजायखेडा : दीर्घ प्रतीक्षेनंतर हरणबारी धरण परिसरात व मोसम खोºयात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. या पावसामुळे खरिपाच्या शेती पिकांना जीवदान मिळण्यास मोठी मदत होणार असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. हरणबारी धरण लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे मोसम नदीस पूर आला असून, या पुरामुळे जायखेडा, सोमपूर, आसखेडा येथील पुलावरून पाणी गेल्याने भडाणे, तांदूळवाडी, नंदिन, जयपूर-मेंढीपाडे, एकलहरे, पिसोळ, वाघळे, श्रीपुरवडेसह अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. नदी पल्याड शेती असलेल्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारापाणी व दूध आणण्यासाठी आपल्या वैयक्तिक वाहनाने ताहराबाद किंवा नामपूर मार्गे १८ ते २० किलोमीटरचा फेरा मारत शेत गाठावे लागत आहे. नदीकाठावरील शेतातील पिकेही पाण्याखाली गेल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. हरणबारी धरण लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे हरणबारी धरणातून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मोसम नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. नदीवरील अनेक पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. प्रशासनाकडून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनीही नदी काठच्या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पोलीसपाटलांमार्फत सूचना दिल्या आहेत. जायखेडा पुलावरून पाणी वाहत असल्याने पुलावरून कुणीही ये-जा करू नये यासाठी ग्रामपंचायत कर्मच्याºयांमार्फत सूचना देण्यात येत आहेत.

Web Title: Rain showers in the area including Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस