सिन्नर तालुक्यात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:39 PM2019-08-04T21:39:47+5:302019-08-04T21:42:01+5:30

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्यात तसेच शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. शहराच्या पश्चिमेस असलेल्या सरदवाडी धरण शनिवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले.

Rain in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात पाऊस

सिन्नर तालुक्यात पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देसरदवाडी धरण ओव्हरफ्लो; म्हाळुंगी, देवनदी, शिवनदी व सरस्वती नदीला महापूर

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्यात तसेच शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. शहराच्या पश्चिमेस असलेल्या सरदवाडी धरण शनिवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले.
शनिवारी सुरू असलेल्या पावसाने शहरातील सरस्वती, शिवनदी तसेच देवनदीच्या पाण्यात वाढ झाल्याने पूर आला होता. तालुक्याच्या अनेक भागात पावसाचा जोर असल्याने गावांचा संपर्क तुटला होता.
तालुक्याच्या पूर्व भागातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर, उंबरदरी, बोरखिंड, कोनांबे व सरदवाडी हे सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठड्यात व आॅगस्टच्या सुरूवातीला पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील धरण साठ्यात वाढ झाली आहे.
पश्चिम पट्यात चांगला पाऊस झाल्याने पूर्व भागासाठी वरदान ठरणारी देवनदी प्रवाहित झाली असून त्यावरील छोटे-मोठे बंधारे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप व रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहे. कोनांबे धरण भरल्यानंतर अवर्षणग्रस्त पूर्व भागात वाहणारी देवनदी दोन दिवस झालेल्या पावसामुळे चांगलीच प्रवाहित झाल्याचे चित्र आहे.
शनिवारी मध्यरात्री देवनदीचे पाणी वडांगळीच्या बंधायांपर्यंत पोहचले होते. देवनदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दातली, खोपडी, मुसळगाव, कुंदेवाडी येथील पुलाच्या फरशीला पाणी लागल्याने संपर्क तुटला होता. पूर्व भागासाठी देवनदी वरदान ठरते. या नदीला पाणी आल्यानंतर बंधारे भरु न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो.
तसेच शहरातून वाहणारी शिवनदी व सरस्वती नदी दुथडी भरून वाहत असल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सरस्वती नदीला पूर आल्याने नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने गावात पाणी शिरले होते. तालुक्याच्या ग्रामीण भागात सुध्दा दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने बळीराजा सुखावला आहे.

चौकट- सरदवाडी धरण भरले
सरदवाडी धरण शनिवारी पहाटे ओव्हरफ्लो झाले. धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शिवनदी प्रवाहीत झाली आहे. त्यामुळे देवनदीच्या पूर पाण्यात आणखी भर पडली असल्याने महापूर आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडत होता. शिवनदीच्या उगमावर धरण असल्याने सांडव्याच्या पाण्यामुळे शिवनदी प्रवाही झाली आहे. हे पाणी शहराजवळ देवनदीस मिळते. सरदवाडी धरण भरल्याने पाणी योजनांना संजीवनी मिळण्यासह शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे.

चौकट- मळा, गावाचा सिन्नरशी संपर्क तुटला
तालुक्यातील वडझीरे परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने नागरेवस्ती, बोडके मळा व गावाचा सिन्नरशी संपर्क तुटला आहे. वडझीरे-सिन्नर रस्त्यावर पुराचे पाणी साचले होते. तसेच तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले वाहत होते. वडांगळीचाही खंडागळीशी दुपारी संपर्क तुटला होता. देवनदीच्या पाण्यात वाढ झाल्याने मुसळगावच्या पुलावरून पाणी वाहत होते. नाशिक-पुणे महामार्गावरही सकाळी आप्पा धाब्याजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

Web Title: Rain in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस