जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:14+5:302020-12-09T04:11:14+5:30
नाशिक : केंद्राच्या नव्या कृषी धोरणाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पुकारण्यात आलेल्या बंदला नाशिकमधून संमिश्र प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी ...
नाशिक : केंद्राच्या नव्या कृषी धोरणाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पुकारण्यात आलेल्या बंदला नाशिकमधून संमिश्र प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली, तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक संघटनांनीदेखील पाठिंबा दर्शविला. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातील अनेक निवेदने देण्यात आली.
कृषी कायद्याला विरोध करीत सुरू असलेल्या आंदोलनाने नाशिकमध्येही वेग घेतला आहे. मागील आठवड्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रत्यक्ष संघटनांनीदेखील सहभाग घेऊन शहर जिल्ह्यात निदर्शने करण्यात आली होती. नाशिकरोड विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सहकार विभागाच्या कार्यालयासमोरदेखील संघटनांनी तसेच डाव्या पक्षांनी आंदोलन पुकारले होते. यामध्ये अनेक विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांचादेखील सहभाग होता.
मंगळवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या आंदोलनालादेखील नाशिकमधून संघटनांनी प्रतिसाद देत शेतकरी हिताचे कायदे झाले पाहिजे, अशी एकमुखी मागणी करीत शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. सकाळपासून अनेक शिष्टमंडळांनी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे निवेदने सुपूर्द केली. आंदोनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघ, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनमंच, छावा जनक्रांती संघटना, नाशिक बार असोसिएशन, नाशिकरोड बार असोसिएशन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना. यांनी निवेदने सादर केली. शेतकरी समर्थनार्थ असलेले मुद्दे निवेदनात नमूद करण्यात आलेली आहेत.