जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 08:58 PM2020-06-02T20:58:39+5:302020-06-03T00:18:16+5:30
दिंडोरी : तालुक्यातील ननाशीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे साद्राळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ननाशी परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने वादळी वारे व मेघगर्जनेसह सुमारे एक तास जोरदार हजेरी लावली.
दिंडोरी : तालुक्यातील ननाशीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे साद्राळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ननाशी परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने वादळी वारे व मेघगर्जनेसह सुमारे एक तास जोरदार हजेरी लावली. वादळी वाºयामुळे साद्राळे येथील जि. प. शाळेच्या छताचे सर्व पत्रे उडून गेले. तसेच किचन शेड, स्वच्छतागृहाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोबतच शाळेतील संगणक संच आणि टीव्ही संचामध्ये पावसाचे पाणी गेल्याने त्यांचेही नुकसान झाले. शाळेतील स्टेशनरी पूर्ण भिजून गेली आहे. सुदैवाने शाळेला सुटी असल्याने जीवितहानी टळली. या नुकसानीची तलाठी गायकर, ग्रामसेवक मोरे आदींनी पाहणी करून पंचनामा केला आहे. त्यात अंदाजे दोन लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
----------------------
सुरगाणा तालुक्यात झाड कोसळले
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील बाºहे परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. वाºयाचा जोर अधिक असल्याने ठाणगाव येथे बंसू गंगाराम पालवी यांच्या घरावर शेजारी उभे असलेले बदामाचे झाड कोसळले. यात घराचे नुकसान झाले. सुदैवाने परिसरात कोणी नव्हते. विजेच्या खांबावरील वीजवाहिन्या तुटून पडल्या. यावेळी वीजपुरवठा खंडित असल्यामुळे अनर्थ टळला. येथील माध्यमिक शाळेजवळील सौरविजेचा खांबही वादळाने आडवा झाला.
--------------------------
मालेगाव परिसरात वातावरणात बदल; गारव्यामुळे नागरिक सुखावले
मालेगाव : शहर, परिसरात सकाळी आठ वाजेच्या सुमारास झालेल्या तुरळक पावसामुळे वातावरणात बदल झाला असून, गारठा वाढल्याने उकाड्यापासून हैराण नागरिक सुखावले आहेत. वातावरणात बदल झाल्याने सर्दी-खोकला आदी साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. आधीच नागरिकांनी कोरोनाची दहशत घेतली आहे. निरभ्र आकाश असताना अचानक आलेल्या सरींमुळे कामानिमित्त बाहेर जाणे नागरिकांनी टाळले. ग्रामीण भागात मात्र शेतकऱ्यांची बी-बियाणे खते यांची खरेदी आणि शेत मशागतीची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरु असल्याचे दिसून आले.
मालेगावी नदीपात्र स्वच्छता रखडली आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेतर्फे
मोसम नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते;
परंतु यंदा शहरात एप्रिल महिन्यापासून कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून येऊ लागल्याने महापालिकेने सर्व लक्ष कोरोनाला रोखण्याकडे दिले आहे. यात नदी स्वच्छता मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष झाले. शहरातील नद्या आणि नाले स्वच्छता मोहीम राबविण्यात गती मिळालेली नाही. यंदा पावसामुळे धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
--------------------------
वीज बिघाडावर उपाययोजनेची मागणी
ननाशी येथे वादळामुळे मुख्य वीजवाहिनीचा एक खांब कोसळ्याने रात्रभर परिसरात अंधार होता. अनेक वृक्ष उन्मळून पडली. ननाशी येथील वीज उपकेंद्राला नाशिकवरून ३३ केव्ही मुख्य वीजवाहिनीवरून वीजपुरवठा केला जातो. या वाहिनीवरील खांब, वीजवाहिन्या जुन्या झाल्याने जीर्ण झाल्या आहेत. थोडासा जरी पाऊस किंवा वादळ झाले की खांब व वाहिन्या तुटून पडतात. यामुळे परिसरातील नागरिकांना नेहमी तीन तीन दिवस अंधारात राहावे लागते. वीज कंपनीने या मुख्य वीजवाहिनीच्या नेहमी होणाºया बिघाडावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या वाहिनीवर बिघाड होणे ही नित्याची बाब झाली आहे.
-------------------------------
तीनशे क्विंटल कांद्यासह शेतोपयोगी साहित्याचे नुकसान
जायखेडा : जयपूर, मेंढीपाडे शिवारातील रतनसिंह प्रतापसिंह सूर्यवंशी या शेतकºयाच्या शेतात वीज कोसळून कांद्याची चाळ व राहत्या घराचे झाप जळून खाक झाले. यात तीनशे क्विंटल कांद्यासह संसारोपयोगी व शेतोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. सोमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जायखेडा व परिसरात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. दरम्यान जयपूर, मेंढीपाडे येथील सूर्यवंशी यांच्या शेतातील राहत्या घरावर वीज पडली. त्यामुळे लागलेल्या आगीत झापासह लगतची कांदाचाळ घरातील संसारोपयोगी व शेतोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शेतकºयाचे हजारो रु पयांचे नुकसान झाले.