सायखेडा परिसरात तिसऱ्या दिवशीही पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 09:03 PM2021-05-30T21:03:13+5:302021-05-31T00:43:45+5:30
सायखेडा : रोहिणी नक्षत्र सुरू झाले आणि दमदार पावसाला सुरुवात झाली, मागील तीन वर्षे रोहिणी नक्षत्रातील पाऊस धोका देत होता. यंदा मात्र रोहिणी सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवसापासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.
सायखेडा : रोहिणी नक्षत्र सुरू झाले आणि दमदार पावसाला सुरुवात झाली, मागील तीन वर्षे रोहिणी नक्षत्रातील पाऊस धोका देत होता. यंदा मात्र रोहिणी सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवसापासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.
गोदाकाठ भागात रविवारी (दि. ३०) पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडल्यामुळे गावातील खोलगट भागात पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात शाळेतील आवार, क्रीडांगण, गावातील रस्ते जलमय झाले आहेत. पावसाची दमदार सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. सायखेडा, भेंडाळी, चांदोरी, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे, औरंगपूर, शिंगवे, चाटोरी, करंजगावसह गोदाकाठ भागातील सर्व गावांत जोरात पाऊस झाला. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.
या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ऊस, चारा शेतात उभा आहे, त्याचे नुकसान होऊ शकते. वेळेवर पाऊस आल्यामुळे खरीप हंगामातील नगदी पिकांची लागवड वेळेत होईल, सोयाबीन, मका, भुईमूग, मूग, उडीद, बाजरी या पिकांची वेळेत पेरणी होईल. वेळेत पेरणी झाली तर पुढील हंगामातीला पिके लवकर घेता येतात. शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस आहे. पावसाने उघडीप दिली की तत्काळ पेरणीपूर्व मशागत, नगदी पिकांची लागवड सुरू होईल.