जूनच्या मध्यावधीत पावसाची वर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:23 AM2020-05-28T00:23:36+5:302020-05-28T00:24:55+5:30
यावर्षी मान्सूनचे आगमन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यासह नाशिकमध्येही होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे.
नाशिक : यावर्षी मान्सूनचे आगमन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यासह नाशिकमध्येही होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे.
१० जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी ‘अम्फॉन’ चक्रीवादळानंतर वेगाने वाहणाºया वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यास मान्सूनला ‘ब्रेक’ लागू शकतो. शहरातील तापमान चाळिशीपर्यंत पोहोचल्यानंतर आता दोन दिवसांपासून पुन्हा घट होऊ लागली आहे. बुधवारी(दि.२७) कमाल तापमान ३७.३ अंश इतके नोंदविले गेले, तर किमान तापमान २४.२अंश इतके होते. यामुळे नाशिककरांना काही प्रमाणात उकाडा जाणवत असला तरी वाºयाचा वेग वाढल्याने उष्म्यापासून दिलासाही मिळत आहे. बळीराजासह सर्वांनाच आता मान्सूनचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात दाखल झालेला मान्सून १४ आॅक्टोबरपर्यंत कायम होता. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शहरांना पावसाचा मोठा तडाखा सहन करावा लागला होता. यंदा केरळमध्ये जूनच्या पहिल्याच दिवशी मान्सून दाखल होणार असल्याने, यंदाही पावसाचा जोर चांगला असेल, असा अंदाज हवामान विभागाने लावला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपनगरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर १६ मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांत चालू महिन्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अम्फॉन चक्रीवादळानंतर मान्सूनच्या प्रगतीसाठीचे वारे निर्माण होत असल्याने, बंगलाच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम भागापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेच्या वरील भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे.