रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा : पोलिसांच्या वास्तू जपणार पावसाचे पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 07:04 PM2020-06-06T19:04:42+5:302020-06-06T19:11:48+5:30
१ जुलै रोजी वनमहोत्सवांतर्गत आयुक्तालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी प्रत्येकी एक रोपटे लावून त्याचे वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी पार पाडतील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले
नाशिक : पोलीस आयुक्तालयापासून सर्वच पोलीस ठाण्यांच्या पक्क्या वास्तू व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींवर पडणारे पावसाचे पाणी यापुढे जमिनित जिरविले जाणार आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा सर्वच वास्तूंना बसविली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जाहिर केले.
‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशा विविध घोषणांद्वार शासकिय यंत्रणेकडून वारंवार जनतेचे प्रबोधन केले जाते किंबहुना ते गरजेचेही आहे; मात्र शासकिय यंत्रणांकडूनही त्याचे पालन तितकेच प्रभावीपणे झाले तर त्याचा जनसामान्यांमध्ये अधिक सकारात्मक संदेश जाण्यास मदत होते. ही बाब लक्षात घेत नांगरे पाटील यांनी शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वास्तूंना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. येत्या १५ तारखेपासून या अभियानाची सुरूवात आयुक्तालयाच्या नुतन वास्तूपासून करण्यात येणार आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पोलीस कवायत मैदानाजवळ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेता किरण भालेराव, चिन्मय उदगिरकर, नमामि गोदा संस्थेचे राजेश पंडित, डॉ. प्राजक्ता बस्ते, उपायुक्त पौर्णिमा चौगुले आदि उपस्थित होते.
प्रत्येक पोलीस रोप लावणार अन् जगवणार
१ जुलै रोजी वनमहोत्सवांतर्गत आयुक्तालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी प्रत्येकी एक रोपटे लावून त्याचे वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी पार पाडतील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले. याबाबत प्रत्येक क र्मचाºयाच्या वार्षिक अहवालात लावलेल्या रोपट्याची सध्याची स्थितीही नमुद करून घेतली जाणार आहे.