येवला शहरासह तालुक्यात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:45 AM2018-06-24T00:45:08+5:302018-06-24T00:45:28+5:30
येवला : शहर व तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दीड तास झोडपून काढले. त्यामुळे शहर परिसरातील सायगाव, एरंडगाव यासह अनेक गावांमध्ये नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. धुळगाव परिसरात पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने नियमाने हजेरी लावली आहे. गुरु वारपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरण होते. येवला परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, भरून वाहू लागले. शनिवारी वारा कमी असल्याने पावसाचा जोर होता. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. असाच पाऊस पडला तर शेतकरी पेरण्या लवकर करतील, अशी अपेक्षा आहे. जोरदार वाऱ्याने शहरातील अनेक झाडांच्या फांद्या पडल्या. काही ठिकाणी फ्लेक्स उडाले. धुळगाव : आठवडाभराची विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केलेल्या पावसाने बुधवार, गुरु वार व शुक्र वार या तब्बल तिन्ही दिवशी धुळगावसह पंचक्र ोशीतील गावांमध्ये जोरदार हजेरी लावली. मागील ४८ तासात निम्म्याहून अधिक बंधारे फुल्ल झाले आहेत. या पावसामुळे गावातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. काही घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. शुक्र वारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. पावसाने काहीशी विश्रांती घेतली की शेतकरी पेरणीला सुरु वात करतील.