पावसामुळे फटाके विक्र ीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:52 AM2019-10-27T00:52:48+5:302019-10-27T00:53:48+5:30
काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पावसाच्या सरींमुळे फटाका विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ४४२ स्टॉलपैकी फक्त १३६ स्टॉलचा लिलाव झाला आहे.
नाशिक : काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पावसाच्या सरींमुळे फटाका विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ४४२ स्टॉलपैकी फक्त १३६ स्टॉलचा लिलाव झाला आहे. महापालिकेने यंदा फटाके विकण्यासाठी फक्त ४ दिवस दिल्यामुळेही स्टॉलच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. तसेच ग्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे विक्रीवर याचा परिणाम झाल्याचे दिसत असले तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्यास यात वाढ होण्याची शक्यता फटाका असोसिएशनच्या वतीने सांगण्यात येत आहे.
महापालिकेकडून दरवर्षी दिवाळीत पोलीस परवानगीच्या अधीन राहून फटाके स्टॉलच्या जागेचे लिलाव जाहीर केला जातो. यंदा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही प्रक्रियेसाठी सप्टेंबरमध्येच लिलाव काढले होते.
यावर्षी विभागातील २७ ठिकाणी ४४२ फटाके स्टॉल विक्रीसाठी उभारणीसाठी लिलाव काढले होते. त्यात २५ ते २९ आॅक्टोबर या दिवसांतच फटाके विक्री करण्याची अट महापालिकेने घातल्याने फक्त १३६ स्टॉलना लिलावात बोली लावण्यात आली. त्यामुळे ३०६ स्टॉल रिकामेच राहिले.
महापालिकेकडून शहरातील नाशिकरोड, सातपूर, सिडको, पंचवटी, डोंगरेवसतिगृह, गोल्फ क्लब मैदान याठिकाणी फटाके विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले होते. स्टॉलच्या भाड्याचा न परवडणारा खर्च तसेच सततचा पडणारा पाऊस यामुळे यंदा स्टॉलची पाहिजे तसी विक्री होऊ शकली नाही.
तसेच पावसामुळे ग्राहकांनीही फटाके खरेदीकडे काही प्रमाणात पाठ फिरविल्यामुळे स्टॉलधारक संकटात पडले आहे.
काही दिवसांपासून पडणारा पाऊ स तसेच महापालिकेकडून मोजके दिवस विक्रीसाठी दिल्यामुळे यंदा स्टॉलचे प्रमाण घटले आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण कमी होत असून, शहरात मोजक्या ठिकाणीच स्टॉल उपलब्ध होणार आहे. यंदा प्रदूषणविरहित फटाक्यांना मागणी असून, ग्राहकांचीही याला पसंती लाभत आहे.
- जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, नाशिक फटाका असोसिएशन
पावसामुळे फटाके विक्रीवर परिणाम होत असून, यामुळे ग्राहकही घराबाहेर पडत नाही. लक्ष्मीपूजनच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्यास यात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी दहा हजारांची लढ तसेच मोठ्या आवाजाचे फटाके कमी झाल्यामुळे यंदा प्रदूषणविरहित फटाक्यांना मागणी आहे. स्टॉलची संख्या कमी झाली असली तरी पुढील दिवसांत ग्राहकांची प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
- अमोल बर्वे, उपाध्यक्ष, नाशिक फटाका असोसिएशन